ट्रकने चिरडल्याने अनोळखी वृद्ध ठार
कोल्हापूर सर्कल येथील घटना : उत्तर रहदारी पोलीस स्थानकात अपघाताची नोंद
बेळगाव : ट्रकने चिरडल्याने रस्ता क्रॉस करणारा 60 ते 65 वर्षीय अनोळखी वृद्ध जागीच ठार झाला. मंगळवार दि. 28 रोजी सकाळी 10.40 च्या दरम्यान कोल्हापूर सर्कल येथील ट्रॅफिक सिग्नलजवळ हा अपघात घडला असून अपघाताची नोंद उत्तर रहदारी पोलीस स्थानकात झाली आहे. मंगळवारी सकाळी एमएच 09 एफएफ 6354 क्रमांकाचा ट्रक चन्नम्मा सर्कलकडून कोल्हापूर सर्कलकडे जात होता. चालक अरविंद रामा जाधव, रा. शिराळा, जि. सांगली, सध्या रा. कारदगा, ता.चिकोडी याने कोल्हापूर सर्कल येथे सिग्नल पडल्याने ट्रक थांबविला. काही वेळानंतर सिग्नल सुरू झाल्यानंतर चालकाने ट्रक पुढे रेटला. त्यावेळी ट्रकसमोरून अंदाजे 60 ते 65 वर्षीय वृद्ध रस्ता क्रॉस करीत होता. मात्र त्याकडे लक्ष न देता चालकाने त्याच्या अंगावर ट्रक घातल्याने वृद्ध समोरील व पाठीमागील चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाला.
मृतदेहाचा अक्षरश: चेंदामेंदा
घटनास्थळावरील दृश्य इतके भीषण होते की मृतदेहाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. अपघाताची माहिती समजताच उत्तर रहदारी पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघातानंतर काहीवेळ कोल्हापूर सर्कल येथे वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविला. मयताची उंची 5 फूट 2 इंच, अंगाने सडपातळ, गोल चेहरा, मोठे नाक, गहूवर्णीय, वय अंदाजे 60 ते 65 पर्यंत, डोक्यावर अर्धा इंच काळे-पांढरे केस आहेत. अंगावर पांढऱ्या रंगाचा शर्ट, त्याच रंगाची हाफ पँट, डोक्यावर पांढऱ्या रंगाची गांधी टोपी, त्याच्या खांद्यावर पांढरा-गुलाबी रंगाचा टॉवेल होता.
संपर्क साधण्याचे आवाहन
मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागृहात ठेवण्यात आला असून वरील वर्णनातील व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यासत्यांनी 0831-2405240 या क्रमांकावर उत्तर रहदारी पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.