For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘अपवित्र दर्शन’

06:30 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘अपवित्र दर्शन’
Advertisement

कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र आदी राज्यात चित्रपट अभिनेत्यांना देवता स्वरुप मानणारा वर्ग मोठा आहे. पडद्यावर चांगुलपणा दाखविणारा अभिनेता खऱ्या जीवनातही आदर्शप्राय असतोच असे नाही. गेल्या चार दिवसातील घडामोडी लक्षात घेता पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियतेच्या जोरावर चित्रपट क्षेत्रातील मंडळी कोणत्या थरापर्यंत पोहोचतात, याचे उदाहरण पहायला मिळते. कर्नाटकातील आघाडीचा अभिनेता चॅलेंजिंग स्टार दर्शनला खून प्रकरणी अटक झाली आहे. गेल्या रविवार दि. 9 जून रोजी चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी (वय 34) नामक युवकाचा खून करून त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. एक दिवस आधी त्याचा खून झाला आहे. बेंगळूर पोलिसांनी अभिनेता दर्शन तुगुदीपसह अकरा जणांना अटक केली आहे. देशभरात सँडलवूडला शरमेने मान खाली घालावी लागणारी ही घटना आहे. खून झालेला रेणुकास्वामी हा दर्शनचा चाहताच होता. कर्नाटकात डॉ. राजकुमार, विष्णूवर्धन, अंबरीश, शंकरनाग असे एकापेक्षा एक आघाडीचे अभिनेते होऊन गेले. डॉ. राजकुमार हे तर कन्नड चित्रपटसृष्टीतील एक अध्यायच होते. प्रत्येक गोष्टीत त्यांचे वागणे बोलणे आदर्श असेच होते. शेजारच्या तामिळनाडू व आंध्रप्रदेशात तर चित्रपट जगतातील अभिनेते, तेथील राजकारणात नेते बनल्याचे अनेक उदाहरणे आहेत.

Advertisement

मुख्यमंत्रीपदापर्यंत ते पोहोचले होते. एमजीआर, एनटीआर, जयललिता, एम. करुणानिधी, हे अभिनय क्षेत्रातूनच राजकारणात आले होते. कर्नाटकातही डॉ. राजकुमार यांनी राजकारणात प्रवेश करावा, यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न केले. शेवटपर्यंत राजकीय प्रवेशाला ते तयार झाले नाहीत. त्यांच्या निधनानंतर त्यांची सून गीता शिवराजकुमार यांनी काँग्रेस व निजदमधून गेल्या विधानसभा, लोकसभा निवडणूक लढविल्या होत्या. दोन्ही वेळा त्यांच्या पदरी अपयशच आले. डॉ. राजकुमार हयात असेपर्यंत मात्र त्यांच्या कुटुंबातून कोणीच राजकारणात आले नाहीत. दर्शन तुगुदीप यांच्या अटकेमुळे सँडलवूडला मोठा धक्काच बसला आहे. त्यांचे अनेक चित्रपट अर्धवट राहिले आहेत. आता खून प्रकरणात दर्शन कारागृहात गेले तर त्या चित्रपटांचे काय होणार? याचा विचार केला जात आहे. ज्या रेणुकास्वामी याचा हकनाक बळी गेला त्याच्या कुटुंबीयांचे काय होणार? याचे सँडलवूडला काहीच पडलेले नाही. रेणुकास्वामी या युवकाचा खून दर्शन तुगुदीप व त्याची मैत्रीण पवित्रा गौडा यांना झालेली अटक या घटनेतून सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरातून काय होऊ शकते? याचे प्रत्यंतर आले आहे.

अलीकडे खून, मारामाऱ्या, गँगवॉरच्या प्रकारांमागे सोशल मीडियाचा अतिरेकी वापर हेही एक कारण आहे, हे काही घटनांवरून अधोरेखित झाले आहे. दर्शन गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. कर्नाटकात त्याच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. जरा कोणी दर्शनविरुद्ध गळा काढला तर लगेच त्याचे चाहते त्यांच्या घरासमोर ठाण मांडतात. आमच्या बॉसला तुम्ही असे का बोललात? असा जाब विचारतात. चाहत्यांमध्ये ‘डी बॉस’ नावाने ओळखला जाणारा दर्शन आपल्या वैयक्तिक जीवनाची घडी विस्कटल्याने अनेकवेळा चर्चेत आला होता. काही वर्षांपूर्वी दर्शनने आपली पत्नी विजयलक्ष्मी हिला मारहाण केली होती. त्यावेळी तब्बल 28 दिवस त्याला कारावास भोगावा लागला होता. या प्रकरणानंतर सँडलवूडमधील दिग्गजांनी दर्शन व विजयलक्ष्मी या दांपत्यातील कलहाला कारणीभूत असणाऱ्या एका उत्तर भारतीय अभिनेत्रीवर बहिष्कार घातला होता. दर्शनचे कौटुंबिक जीवन काही रूळावर आले नाही. गेल्या दहा वर्षांपासून पवित्रा गौडा या अभिनेत्रीसमवेत त्याची मैत्री होती. या मैत्रीला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर पवित्राने दर्शनसोबतचा आपला फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. ‘आमच्या मैत्रीला दहा वर्षे पूर्ण झाली.’ यानिमित्त हा फोटो शेअर केला होता. फोटोत पवित्रा गौडाची मुलगीही होती.

Advertisement

या फोटोमुळे दर्शनची पत्नी विजयलक्ष्मी भडकली. सोशल मीडियावर दुसऱ्याच्या पतीसोबतचा फोटो शेअर करणे चुकीचे आहे, अशी स्पष्ट भूमिका विजयलक्ष्मीनी मांडली होती. या भूमिकेला दर्शनच्या अनेक चाहत्यांनी पाठिंबा दिला होता. पाठिंबा देणाऱ्यांमध्ये खून झालेला रेणुकास्वामी हाही होता. या वादात विजयलक्ष्मीला पाठिंबा देण्याच्या भरात रेणुकास्वामीने पवित्रा गौडाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यामुळेच संतप्त झालेल्या पवित्राने दर्शनला ही गोष्ट सांगितली. औषध दुकानात काम करणाऱ्या रेणुकास्वामीचे 8 जून रोजी अपहरण करून फिल्मी स्टाईलने त्याचा खून करण्यात आला आहे. खून प्रकरणात दर्शनला अटक झाल्यानंतर त्याचे चाहते रस्त्यावर उतरले आहेत. ‘आमचा बॉस खून करणाऱ्यांपैकी नाही. त्यांना झालेली अटक हा एक षड्यंत्राचा भाग आहे’, अशी ओरड त्यांनी सुरू केली आहे. यावरून आपल्या आवडत्या अभिनेत्याने काहीही केले तरी त्याचे चाहते पाठीशी उभे राहतात, हे अधोरेखित झाले आहे. आपण व आपल्या मैत्रिणीसह या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी दर्शनने मोठी डीलही केली होती. त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी पवित्रा गौडासह दर्शनला अटक झाली आहे. त्याला वाचविण्यासाठी काही राजकीय नेत्यांची धडपड सुरू झाली आहे. त्यामुळेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी खून झालेल्या रेणुकास्वामीच्या कुटुंबीयांनी केली आहे. रेणुकास्वामीची पत्नी पाच महिन्यांची गरोदर आहे. तो स्वत: दर्शनाचा मोठा चाहता होता. पैसा, प्रसिद्धी डोक्यात गेल्याने माजलेल्या दर्शनने मात्र आपल्या चाहत्याला माफ केले नाही.

दर्शन प्रकरणानंतर माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा अश्लील चित्रफित प्रकरण मागे पडले आहे. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर हा एक या प्रकरणातील ठळक मुद्दा आहे. आपले आवडते राजकीय नेते किंवा अभिनेत्यांबद्दल टिप्पणी करताना लक्ष्मणरेषा ओलांडली तर जीवावर बेतण्याचा धोका ओळखणे जरुरीचे होते. आपल्या आवडत्या अभिनेत्याचा संसार ठीक करण्यासाठी त्याच्या पत्नीला पाठिंबा देण्याच्या भरात मैत्रिणीला अश्लील शिवीगाळ करून काही आक्षेपार्ह फोटो पोस्ट करणे रेणुकास्वामीच्या जिवावर बेतले आहे. दर्शनने व्यवस्थितपणे हे प्रकरण हाताळले असते तर कायद्याच्या चौकटीत रेणुकास्वामीला हिसका दाखविणे शक्य होते. मात्र, फिल्मी स्टाईलने अपहरण करून एका शेडमध्ये कोंडून रेणुकास्वामीचा अनन्वित छळ करून खून करण्यात आला आहे. या खुनाने चॅलेंजिंग स्टारची प्रतिमा किलिंग स्टार अशी झाली आहे. दर्शनचे वडील तुगुदीप श्रीनिवास हे डॉ. राजकुमार यांच्या काळातील नावाजलेले खलनायक होते. दर्शन मात्र वडिलांनाही मागे टाकून आघाडीचा अभिनेता बनला होता. त्याचा आणखी एक क्रूर चेहरा आता जगासमोर आला आहे. या घटनेची जोरदार चर्चा सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना पोक्सो प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे. अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

Advertisement
Tags :

.