सावगावमध्ये विजेच्या धक्क्याने सेंट्रिंग कामगाराचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : विजेच्या धक्क्याने सावगाव येथील एका सेंट्रिंग कामगाराचा मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी सावगाव येथे ही घटना घडली असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. महेश वसंत पाटील (वय 32) असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. रविवार दि. 1 सप्टेंबर रोजी दुपारी सेंट्रिंग खोलताना बांधकामाशेजारी असलेल्या वीजतारेचा स्पर्श होऊन त्याला विजेचा धक्का बसला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महेशला सिव्हिल हॉस्पिटलला हलविताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे.
महेश सेंट्रिंग काम करीत होता. स्वत:चे घर बांधण्याचे काम त्याने हाती घेतले होते. रविवारी दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास आपल्याच नव्या बांधकामावर सेंट्रिंग खोलताना विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. महेशच्या पश्चात आई-वडील, भाऊ, काका असा परिवार आहे. घटनेची माहिती समजताच गावातील प्रमुख व तरुणांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. बेळगाव ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला. उत्तरीय तपासणीची प्रक्रिया सुरू होती.