For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अविस्मरणीय विश्वविजय

06:55 AM Nov 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
अविस्मरणीय विश्वविजय
Advertisement

भारतीय महिला क्रिकेटरांचा संघर्षपूर्ण प्रवास आणि पुरुष क्रिकेटच्या चकाकीच्या सावलीतून बाहेर पडत, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये इतिहास घडला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात, भारतीय महिला क्रिकेट संघाने 52 धावांनी विजय मिळवून पहिल्यांदाच विश्वचॅम्पियन होण्याचा मान पटकावला. दीप्ती शर्माने 5/39 च्या कमाल गोलंदाजीने आणि शफाली वर्माच्या आक्रमक फटकेबाजीने हे स्वप्न साकार केले. पण हा विजय म्हणजे फक्त एक सामना नव्हता; हा त्या प्रत्येक खेळाडूच्या रक्ताने, घामाने आणि अश्रूंनी रंगलेल्या संघर्षाची कथा आहे. खरा विजय फक्त ट्रॉफी नाही, तर तो पुरुष संघांच्या यशाच्या तोलामोलाचा आहे हे मानण्यात आहे. 1983 च्या विश्वचषक विजयापासून ते आयपीएलच्या करोडो डॉलर्सच्या करारांपर्यंत. विराट कोहली, रोहित शर्मासारखे स्टार्स जाहिराती, ब्रँड्स आणि स्टेडियम भरून टाकणाऱ्या प्रेक्षकांमध्ये वावरतात. पण महिलांच्या क्रिकेटसाठी? ते अजूनही संघर्षाचे मैदान आहे. 2006 पर्यंत बीसीसीआयने महिलांच्या क्रिकेटकडे दुर्लक्ष केले होते, सुविधा अपुरी, मीडिया कव्हरेज नगण्य, आणि सामाजिक दबावाने अनेक कुटुंबानी मुलींना बॅट हातात घेण्यापासून रोखले. 2017 च्या विश्वचषक अंतिम सामन्यात इंग्लंडकडून 9 धावांनी हरण्यापासून ते 2020 च्या टी 20 विश्वचषक फायनलपर्यंत, प्रत्येक पराभवाने त्यांना आणखी मजबूत केले. पण 2025 चा हा विजय त्यांच्या धैर्याची, त्यागाची आणि एकजुटीची ओळख आहे. या 15 खेळाडूंनी अपार अडचणींना तोंड देत हे सोनेरी क्षण घडवले. कर्णधार हरमनप्रीत कौर पंजाबच्या मावी येथील साध्या कुटुंबात जन्मलेली, लहानपणापासूनच पुरुषप्रधान समाजात क्रिकेट खेळण्यासाठी लढली. 2017 च्या विश्वचषक फायनलमध्ये तिच्या 171 धावांच्या धडाकेबाज खेळाने जगाला सरळ केले, पण त्यानंतर दुखापती आणि नेतृत्वासंबंधी टीकेने तिला खचवण्याचा प्रयत्न केला.  आज, 35 व्या वर्षी, तिच्या नेतृत्वाने संघाला विश्वविजेता बनवले हा तिच्या लढाईचा विजय आहे. उपकर्णधार स्मृती मानधना, महाराष्ट्रातील सांगलीच्या या डावखुऱ्या सलामीवीरबालेने क्रिकेटला काव्यरूप बनवले. लहानपणात अपुऱ्या ग्राउंडवर सराव, सोबत मुली नसल्याने मुलांच्यातच खेळण्याची सक्ती, पुरुष खेळाडूंच्या तुलनेत कमी संधी हे तिचे संघर्ष होते. 2013 मध्ये पदार्पण करताना तिला ‘नाजूक’ म्हणून हिणवले गेले, पण तिने दोन सलग शतके ठोकून उत्तर दिले. आज, तिच्या एलिगंट फटकेबाजीने ती एकदिवसीय आणि टी ट्वेन्टी दोन्हीमध्ये टॉप-3 मध्ये आहे. ओपनर शफाली वर्मा, रोहतकच्या या 21 वर्षीय धुरंधर कन्याने क्रिकेटला नवे वळण दिले. 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारी शफाली, ही कुटुंबाचे मन वळवूनच मैदानावर उतरली. 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणमध्येच तिने 16 वर्षांची सर्वात कमी वयाची अर्धशतककर्ती म्हणून रेकॉर्ड केले, पण नंतरच्या अपयशाने तिला संघाबाहेर व्हावे लागले. यंदा डब्ल्यूपीएलमध्ये 304 धावांसह तिने सिद्ध केले की, अपयश हे शेवटचे नसते. अंतिम सामन्यात तिच्या आक्रमक खेळाने संघाला मजबूत आधार दिला हा तिच्या धैर्याचा विजय आहे. मधल्या फळीतील जेमिमा रोड्रिग्स, मुंबईच्या या ख्रिश्चन कुटुंबातील मुलीने धार्मिक भेदभाव आणि अपेक्षांचा बोजा वाहिला. 2018 पदार्पणानंतर तिने द्विशतक ठोकले, पण 2024 मध्ये आजारपणाने तिला संघाबाहेर ढकलले. तरीही, तिच्या शांत स्वभावाने आणि मधल्या षटकांत स्थिरतेने संघाला आधार दिला. ऑलराऊंडर दीप्ती शर्मा, आग्रा येथील या बहुआयामी खेळाडूने क्रिकेटला नवे रूप दिले. ग्रामीण भागातील साध्या कुटुंबात जन्मलेली दीप्ती, लहानपणात अपुऱ्या सुविधांमुळे रस्त्यावर सराव करत असे. 2014 नंतर तिने बॅट आणि बॉल दोन्हीने कमाल केली, पण 2020 च्या विश्वचषक फायनलपर्यंतच्या अपयशाने तिला मानसिक ताण दिला. अंतिम सामन्यात 5 बॉलर घेतल्याने ती ‘मॅन ऑफ द मॅच’ झाली हा तिच्या कष्टांचा परिपूर्ण परिणाम आहे. विकेटकीपर रिचा घोष, बंगालच्या या 22 वर्षीय फिनिशरने क्रिकेटला ऊर्जा भरली. सिलीगुडीच्या गरीब कुटुंबात जन्मलेली रिचाने, लहानपणी मुलांच्यासोबत खेळत लिंगभेदाला तोंड दिले. 2019 मध्ये तिच्या वेगवान धडाकेबाजीने नाव कमावले, पण दुखापतींनी तिला सतावले. डब्ल्यूपीएलमध्ये  जबरदस्त स्ट्राइकरेटसह सिद्ध केले की, ती फिनिशरच नाही, तर विजेती आहे. रिचाने विकेट्स घेताना आणि फटके मारताना तिच्या संघर्षाची आठवण करून दिली. मधल्या फळीतील हर्लीन देओल, हिमाचल प्रदेशातील या खेळाडूने 2023 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध शतक ठोकून इतिहास घडवला. लहानपणातील आर्थिक अभाव आणि अपुऱ्या ग्राउंडमुळे तिला खूप संघर्ष करावा लागला. तिच्या आक्रमक खेळाने अंतिम सामन्यात मधल्या षटकांना मजबुती दिली. प्रतीका रावल, या नव्या चेहऱ्याने 500 धावांचा विक्रम केला. शफालीला रिप्लेस करत तिने स्थिरता आणली, पण लहानपणातील सामाजिक दबावाने तिला क्रिकेटकडे वळवले. ती संघाची नवीन आशा आहे. अरुंधती रे•ाr, हैदराबादची वेगवान गोलंदाज, दुखापतींनी तिला त्रास दिला. पण पर्थमध्ये 4 विकेट्स घेत तिला सूर गवसला. तिच्या संघर्षाने पेस

Advertisement

अटॅक मजबूत केला. राधा यादव, दिल्लीची डावखुरी स्पिनर, आक्रमक शैलीसाठी ओळखली जाते. लहानपणात अपुऱ्या नेट्समध्ये सराव करत तिने विश्वचषकपर्यंत मजल मारली, पण अपयशाने तिला हादरवले. तिच्या स्पिनने दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगलाइनला धूळ चारली. रेणुका सिंह ठाकूर, हिमाचलची पेसर, दुखापतीमुळे दीर्घकाळ संघाबाहेर होती. 2019-20 च्या लीगमध्ये टॉप विकेटटेकर, पण पायाच्या जखमेने तिला लढा द्यायला लावला. कृष्णी गौड, तेलंगणाची नवखी, अपुऱ्या सुविधांमधून उदयास आली. तिच्या वेगाने संघाला नवीन आयाम दिला. अमानजोत कौर, पंजाबची ऑलराऊंडर, आर्थिक अडचणींना तोंड देत तिने बॅट आणि बॉल दोन्हीने योगदान दिले. स्नेह राणा, उत्तर प्रदेशची ऑफ-स्पिनर, 2022 च्या इंग्लंड दौऱ्यात 5 विकेट्स घेत प्रसिद्ध झाली. लहानपणातील गरीबीने तिला क्रिकेटकडे वळवले. श्री चरणी, तामिळनाडूची लेग-स्पिनर, 2025 च्या डब्ल्यूपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी कमाल करत तिने नवीन विक्रम केला. लहानपणातील संघर्षाने तिला मजबूत बनवले. अंतिम सामन्यात 1/48 ने तिने योगदान दिले. हा विजय केवळ म्हणजे केवळ चषक नाही; हा प्रत्येकीच्या डोळ्यातील अश्रूंचा आनंदोत्सव आहे. या महिलांनी सिद्ध केले की, संघर्षातूनच यशाला खरी चकाकी येते.

Advertisement
Advertisement
Tags :

.