For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राममंदिर प्रतिष्ठापनेचा वारणा परिवारातील आनंदोत्सव अविस्मरणीय सोहळा

11:09 AM Jan 23, 2024 IST | Kalyani Amanagi
राममंदिर प्रतिष्ठापनेचा वारणा परिवारातील आनंदोत्सव अविस्मरणीय सोहळा
Advertisement

हजारो अबालवृद्धानी अनभुवला सोनेरी क्षण, कारसेवक प्रमोद सगरे यांचा सत्कार : गीत रामायणावर पाच हजार विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार,नेत्रदिपक आतिषबाजी

Advertisement

वारणानगर प्रतिनिधी

येथील प्रमुख मार्गावर भव्य रथ, शोभायात्रेत जय श्री रामाचा अखंड जयघोष,गीत रामायणातील गीतावर पाच हजार विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार,लेसर शो, नेत्रदिपक आतषबाजीने वारणा नगरीत आयोध्येतील श्री राममंदिर प्रतिष्ठापनेचा वारणा परिवाराने आयोजीत केलेला आनंदोत्सव अविस्मरणीय सोहळा हजारो अबालवृद्ध रामभक्तांनी हा सोनेरी क्षण अनुभवला.

Advertisement

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर निर्माण केलेल्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना झाली. या पार्श्वभूमीवर आज वारणा परिवाराच्या वतीने शिवनेरी क्रीडांगणावर आयोजीत विशेष कार्यक्रमांची सुरवात करवीर पिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, शिराळा गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ महाराज, आमदार डॉ विनय कोरे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. सकाळी वारणेच्या निवृत्ती कॉलनीतील श्रीराम मंदिराला फुलांनी सजवून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी विधिवत धार्मिक कार्यक्रम, अभिषेक, भजन, किर्तन संपन्न झाले. त्यानंतर अयोध्येतील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले याचा लाभ हजारो भक्तांनी घेतला.

दुपारी चार वाजता राम मंदिरापासून शोभा यात्रेला प्रारंभ झाला. पालखीत प्रभू श्रीरामाची मुर्ती विराजमान करुन शोभायात्रेस प्रारंभ झाला. या शोभा यात्रेत विविध पारंपरिक वाद्यांचा समावेश होता. तसेच राम, लक्ष्मण, सिता, हनुमान यांच्या जीवनावरील जिवंत प्रसंग विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत रथयात्रेत उभा केले. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला. ५० महिलांनी भारतीय वेशभूषा परिधान करून डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. यामध्ये वारणा महिला समुहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. तर पुरुष शोभायात्रेत पारंपरिक वेशभुषेसह सहभागी झाले मध्यभागी वारणा समुहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे, ज्योतिरादित्य कोरे यांच्यासह वारणा समुहातील पदाधिकारी सोहळ्यात सहभागी झाले. यामध्ये कोडोलीसह परिसरातील राजस्थानी रामभक्त सहभागी झाले त्यानी राजस्थानी नृत्य करीत सर्वांची मने जिंकली.
ही शोभायात्रा सायंकाळी सुमारे तीन किलोमीटर अंतरावरुन पारंपारिक वाद्यांच्या गजरात साडेसहाच्या सुमारास शिवनेरी क्रीडांगणावर पोहोचली.

शिवनेरी क्रीडांगणावर ७२ फुटी श्रीरामाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. ही प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. तसेच मैदानाच्या चारही बाजूला प्रभू श्रीरामाच्या जन्मापासून आयोध्येत परतल्यानंतर राज्याभिषेकाचे चित्र फलक लावण्यात आले होते. त्यामुळे वातावरण राममय झाले.

श्रीरामाच्या गीतावर लेसर शोचा झगमगाट मैदानाच्या चारी बाजूला आकर्षक विद्युत रोषणाई करीत श्रीरामाच्या गीताच्या तालावर
लेसर शोचा झगमगाट डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. वारणा शिक्षण समुहातील विविध शाळांतील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी डोक्याला श्रीराम उद्घोषाची पट्टी, भगवे स्कार्फ घालून एकाच गणवेशामध्ये सुमारे अर्धा तास गीत-संगीत-नृत्यासह श्रीरामाचा जयघोष करीत उपस्थितांची मने जिंकली.

करवीर पिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती पीर पारसनाथ महाराज, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार डॉ विनय कोरे,सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशोकराव माने, केडीसी बॅंकेचे संचालक विजयसिंह माने, जिल्हा परिषद माजी सदस्या मनिषा माने, वारणा उद्योग समुहातील पदाधिकारी उपस्थित होते. समन्वयक प्रा. जीवनकुमार शिंदे, प्रा. नामदेव चोपडे यांनी सूत्रसंचालन केले.

कोडोलीसह परिसरात विविध कार्यक्रमाने वातावरण राममय

अयोध्या येथे संपन्न झालेल्या प्रभू श्रीरामाच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठापना निमित्त कोडोलीत सोमवारी दुपारी भक्तीमय वातावरणात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विविध ठिकाणी विद्युतरोषणाई तसेच सर्वत्र रांगोळी काढून भगवे ध्वज लावणेत आले होते त्यामुळे सर्वत्र राममय वातावरण निर्माण झाले होते.
येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अयोध्येचे कार सेवक व कोडोली गावचे सुपुत्र प्रमोद सगरे यांच्या हस्ते व गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ जयंत पाटील व सरपंच भारती पाटील यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून. प्रभू श्रीरामाची आरती करून शोभयात्रेस सुरवात करण्यात आली. भव्य अशा अश्वारूढ रथामध्ये प्रभू श्रीरामाची प्रतिमा ठेवणेत आली होती तसेच दुसऱ्या रथामध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान वेष परिधान केलेल्या मुलांची मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रा मध्ये सर्व जातीधर्माचे लो कासह बालगोपाळ,महिला वर्गही मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

यावेळी नागरीकांनी पारंपारीक वेशभूषेबरोबरच भगवे कपडे परिधान करून भगवे ध्वज घेतले होते त्यामुळे सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. सकाळ पासून ग्रामपंचायतीच्या वतीने शिवाजी चौकात गावातील अनेक तरुण मंडळाच्या वतीने गल्लोगल्ली स्टेज उभारून श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. ही शोभायात्रा शिवाजी चौकातून प्रारंभ करून प्रमुख्य मार्गावरून सर्वोदय चौकापर्यंत ही यात्रा काढण्यात आली. यावेळी उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आला सर्वोदय चौक येथे सांगता होऊन भाविक वारणेतील राममंदिर पासून सुरू झालेल्या शोभायात्रेत सहभागी झाले.

कारसेवक प्रमोद सगरे यांचा सत्कार आणि अक्षदा समर्पन

अयोध्या येथील कारसेवेत प्रत्यक्ष सहभागी असलेले कोडोली गावचे सुपूत्र प्रमोद कल्लांपा सगरे यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला त्याच्या हस्ते विविध कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कोडोलीसह परिसरातील गावातील मंदिरात व घरोघरी रांगोळीचा सडा काढून भगवे ध्वज काही ठिकाणी गुढ्या उभारल्या होत्या मूर्ती स्थापनेवेळी श्री च्या मूर्ती व प्रतिमावर मंगल अक्षदांची मंदिर कार्यपूर्ती निमित्त समर्पन आहूती देण्यात आली.

Advertisement
Tags :

.