स्वप्न अन् सत्याच्या सीमारेषेवर उलगडणार नात्यांचा भावस्पर्शी प्रवास
‘इरावती’ 12 फेब्रुवारीला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार
नाती जोडली जाणं आणि ती मनापासून जपणं ही आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. जन्माला आल्यापासून आपण काही नात्यांच्या बंधनात गुंफले जातो, तर काही नाती आयुष्याच्या प्रवासात नकळत जुळत जातात. काही नाती रक्ताची असतात, तर काही माया, प्रेम, आपुलकी आणि विश्वासाच्या धाग्यांनी विणलेली असतात. अशाच जिव्हाळ्याघ्च्या नात्यांची, आपुलकी आणि त्यासोबत रहस्याची जोड असणारी गोष्ट सांगणारा ‘इरावती’ हा मराठी चित्रपट 12 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. चिन्मय प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन निलेश देशपांडे यांनी केले आहे.
चित्रपटात सतीश पुळेकर, अलका कुबल-आठल्ये, विजय गोखले, सुनील बर्वे, संतोष जुवेकर, जुई भागवत, स्वरदा करंदीकर, मृणालिनी जांभळे आणि अवंती सानप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुभवी कलाकारांची दमदार फळी आणि नात्यांमधील भावविश्व उलगडणारी कथा यामुळे ‘इरावती’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रत्येक नात्याला स्वत:ची एक गोष्ट असते. या नात्यांमधील भावभावना, त्यात दडलेली ओढ आणि माणसांना एकमेकांशी जोडणारे अदृश्य धागे यांचा वेध ‘इरावती’मधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही कथा प्रेक्षकांना केवळ भावनिक अनुभव देणार नाही, तर आपल्या आयुष्यातील नात्यांकडे नव्याने पाहण्याची जाणीवही करून देईल असे उद्गार दिग्दर्शक निलेश देशपांडे यांनी काढले आहेत. इरावती चित्रपटाची कथा डॉ. दिनेश वैद्य यांनी लिहिली असून संवादलेखनाची जबाबदारी त्यांच्यासोबत नंदू परदेशीने सांभाळली आहे.
