सर्वपक्षात अस्वस्थ नेते, भरकटलेले कार्यकर्ते!
राज्याच्या राजकारणात रोजचा दिवस नवी नौटंकीचा ठरताना दिसत आहे. सर्वच पक्षांमध्ये व्यापून राहिलेली अस्वस्थता आता थेट नेत्यांना अस्वस्थ करू लागली आहे. त्यामुळेच अजितदादा, मतदारांना मी तुमचा गडी आहे का? असे वैतागून विचारतात, एकनाथ शिंदे ठाकरे सेनेवर जहरी टीका करतात, आदित्य ठाकरे तीन तीन वेळा फडणविसांना भेटतात.पवारांचे अनुयायी जयंतरावांना दूर करण्याची मागणी करतात.
सत्ता कुणाचीही असली तर त्या सत्तेतील कार्यकर्ते नेहमीच अस्वस्थ असतात. एक तर सत्तेचा लाभ त्यांच्यापर्यंत येत नाही ही त्यांची तक्रार असते. विरोधक त्यांना डिवचून आपली कामे करून घेत असतात आणि सत्ताधारी म्हणून पोलिसांच्या बुटांनी पाय तुडवून घेत कार्यकर्ते आणि नेत्यांना मंत्र्यांच्या मागे अपमान गिळून उभे रहावे लागत असते. पायावर बुटाचा पाय पडला तरी पुढे कॅमेऱ्यात छवी चांगली दिसावी म्हणून नाटकी हसावे लागते. भाजप आणि विशेष करून रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांना तर याची सवय खूप आधीपासून जडलेली आहे. आता तर अनेकांना त्याबद्दल त्यांनी तक्रार करणेही सोडून दिले आहे. अलीकडेच एका ज्ञाती संस्थेच्या कार्यक्रमात सत्ताधारी पक्षाच्या झाडून सगळ्या मोठ्या नेत्यांनी दांडी मारली. आयोजकांना दिलासा देणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते बोलायला उभे राहिले तरी सुध्दा मंत्री महोदय काही कार्यक्रमाला पोहोचले नाहीत. काहींचे फोन येतील असे हे नेते माईकवरून सांगत असताना त्यांचा फोन खणाणला. ज्येष्ठ नेत्यांनी उत्साहाने फोनमध्ये डोकावले, भलत्याचेच नाव पाहून हिरमुसले. पण, समोर कॅमेरा पाहून चेहरा हसरा करत बोलत राहिले... आजपर्यंत पक्षाला साथ दिलेल्या मंडळींचे आभार मानताना अमूक नेते येणारच होते, तमूक नेत्यांनी मला सांगितले होते, अमूक नेत्यांचा थोड्याच वेळात फोन येईल, त्यांच्या भोवती खूप गर्दी असल्याने ते लवकरच बोलतील असे ते सांगत राहिले आणि समोरचे लोकही सवयीप्रमाणे ऐकत राहिले.... आता आपल्याला भेटायला येण्याची आणि आपले काही म्हणणे ऐकून घेण्याची कोणाला गरज उरलेली नाही याची पुरती जाणीव तिथे जमलेल्या प्रत्येकाला झाली होती. मात्र तसे न दाखवता जमलेल्यांना हसून निरोप देण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावीच लागली! हे सगळ्याच सत्तेतल्या राबणाऱ्यांचे हाल असतात. पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीतही तसेच घडायचे आता भाजप आणि इतर पक्षात घडत आहे इतकेच. त्याचमुळे भाजपने राज्यभर सदस्यता नोंदणीचा खूपच गवगवा केला. नेत्यांना, बुथच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवून सदस्यता नोंदणीची आखणी केली. तेवढेही कमी पडेल म्हणून ऑनलाईन सदस्यत्वाची लिंकही ओळखीच्या मंडळींना पाठवली. नजिकच्या काळात खूप मोठ्या संख्येने सभासद नोंदणी झाल्याचे आकडे प्रसिध्द होतीलही. पण, वास्तव काय आहे ते बुथ, युथ सर्वांना माहिती झालेले आहे! तसेही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलतील तसे जिल्हाध्यक्षही बदलतीलच. पुढे येणारे पाहून घेतील असे म्हणत इतरांना आपला कार्यकाल संपत आल्याची कल्पनाच देऊन टाकली. ही अस्वस्थता सगळ्याच पक्षात आहे.
ठाकरे सेनेला विधानसभेत बसलेला धक्का मोठा आहे. पक्षाचे कोकणातील राजापूरचे नेते राजन साळवी आपले दु:ख सांडायला मातोश्रीवर गेले. पण, तिथे आधीच दु:खाचा महासागर आहे. त्यात काळ पडला ओहोटीचा...! विरोधी भरतीला तिथे वाव कुठला असणार? ही अस्वस्थता असली तरीही मुंबई महापालिकेचे आव्हान घेऊन ठाकरे धडपड करत आहेत. विविध प्रकरणे उकरून काढत आहेत. एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या शिलेदारांना डिवचत आहेत. नुकतेच मुंबईचे प्रश्न आणि तक्रारी घेऊन ते देवेंद्र फडणवीस यांना भेटले. फडणवीस यांनीही तिसऱ्यांदा त्यांची भेट घेतली. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले नसते तरच नवल. रंग बदलणाऱ्या सरड्याची ही नवीन जात आहे अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. या शब्दांमधील राग सहज दिसून येणारा आणि शिंदेंची अस्वस्थता उघड करणारा आहे. त्यांना चिडवायची संधी इतर सोडत नाहीत हेही यातून सहज दिसून येत आहे. अजितदादा अस्वस्थ आहेत आणि त्यांच्या विरोधात धनंजय मुंडेंवर भाजपचे नेते तुटून पडत आहेत हे काही लपून राहिलेले नाही. त्यातून उठणाऱ्या चर्चांनी दादा आधीच संतापले असताना मतदार संघातील कार्यकर्त्यांनी दादा गावाकडे आल्याची संधी साधून आपल्या मागण्या जोराने मांडण्याचा प्रयत्न केला आणि दादांच्या संयमाचा कडेलोट झाला. मते दिली म्हणजे मी तुमचा सालगडी झालो नाही असे दादा म्हणाले आणि त्यांनी निवडणुकीत परिधान केलेले गुलाबी जॅकेट लोकांना आठवले!
काँग्रेसनेते विजय वडेट्टीवारांची अस्वस्थताही अजून संपायला तयार नाही. त्यांनी नाना पटोले आणि संजय राऊत यांनी विधानसभेच्या जागावाटपात वेळ घालवला. तिढा दोन दिवसात सुटला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचाराला पुरेसे होते असे म्हणून हे षडयंत्र होते असे भासवण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरीची त्यांची वक्तव्ये आणि भुजबळांना मुंडेंचे मंत्रीपद मिळू शकते असे केलेले भाकित यासर्वांचा विचार करता काँग्रेसमधील हा गडबडगोंधळ पुढे किती वाढेल याबद्दल चिंता आहे. पश्चित महाराष्ट्रातील मराठा नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवावे अशी पक्षातून मागणी होत आहे. तर विदर्भातील एका नेत्याने दिल्लीतील वरिष्ठांना प्रदेशाध्यक्ष ओबीसी, दलित किंवा मुस्लिम असावा असा सल्ला दिला आहे. परिणामी या पक्षात नाराजी अधिक वाढत चालली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटील यांच्याकडून कधी एकदा काढून घेतले जातेय असे त्यांच्या पक्षात खूप आधीपासून सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर पवारांसोबत येणार ही बातमी जयंतरावांच्या तंबूतून फुटली असा ठपका त्यांच्यावर खासगीत ठेवला जातोय आणि तेव्हापासून होणाऱ्या प्रत्येक टिकेला जयंतराव उत्तर देताहेत. माझा कार्यकाल विधानसभा निवडणुकीत यश मिळेपर्यंत राहूद्या असेही ते एकदा बोलून गेले होते. आता मंडळींना ती संधी वाटत असली तरी जितेंद्र आव्हाड किंवा रोहीत पवार आजच्या घडीला नेतृत्व करायला तयार होतील असे दिसत नाही. यश मिळाले असते तर हर्षवर्धन पाटील यांचे नाव पुढे आले असते. आता तसेही घडणे अवघड दिसते. पवारांना युवकांच्या हाती राज्यातील पक्ष सोपवून ज्येष्ठांना राष्ट्रीय नेते बनवायचे आहे. पण, तिथेही खासदार फुटीची चिंता आहेच. अस्वस्थता अशी सर्वत्र व्यापली आहे. राज्यातील मंत्री सुध्दा आपल्या खात्यात येऊन प्रभावी काम करण्यास तयार नाहीत तिथे इतरांचे काय?
शिवराज काटकर