उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने उपक्रम हाती घ्या
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची बागायत अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : बागायत खात्याच्या विविध योजनांतर्गत प्रामुख्याने राष्ट्रीय बागायत मिशन, नरेगा योजनेंतर्गत अधिकाधिक शेतकऱ्यांना मदत देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उपक्रम हाती घ्यावेत, अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली. जिल्हा पंचायतीच्या सभागृहात मंगळवारी झालेल्या बागायत खात्याच्या राष्ट्रीय बागायत मिशन योजना व राज्य बागायत विकास एजन्सी योजनेच्या जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीमध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी न करता बागायती उपक्रम हाती घेण्यासाठी खात्यांतर्गत विविध योजनातून आर्थिक मदत देणे, 2025-26 मधील राष्ट्रीय बागायत मिशन योजनेंतर्गत अधिकाधिक प्रचार करून शेतकऱ्यांना उपयोगी व्हावे, अशादृष्टीने कार्य करण्यासंबंधी बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना शिंदे यांनी केली. राज्य बागायत विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व बागायती क्षेत्र व नर्सरीमधून दर्जेदार बागायती रोपे तयार करणे व शेतकऱ्यांना पिके संवर्धन करण्यासंबंधी तांत्रिक माहिती देण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. बागायत खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड, पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक राजीव, रेशीम खात्याचे उपसंचालक महेश, जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील बागायत खात्याचे अधिकारी व कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.