स्वत:ला समजून घेताना
मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे जोहॅरी विंडो ही चार तावदानांची खिडकी म्हणता येईल, आपल्या स्व-जाणिवेचे हे चार भाग आहेत. 1.प्रकट-स्व, 2.अंध-स्व 3.खाजगी-स्व 4.अज्ञात-स्व. अशी कल्पना करा की खिडकीची एक बाजू, तावदानाची एक बाजू जर धुळीने माखलेली आहे किंवा अर्धपारदर्शक आहे तर आपण पलीकडचे नीट पाहु शकू का? अगदी तसेच या जोहॅरी विंडोचे तावदान एकबाजूदर्शी असेल तर दुसऱ्या व्यक्तीची मते, माहिती, भावना स्पष्टपणे कळणार नाहीत. परस्पर संबंधामध्ये अडथळा किंवा गोंधळ निर्माण होईल. जर हेच तावदान टू वे ग्लास असेल तर दोन्ही बाजूंची देवाणघेवाण मुक्त आणि खुलेपणाने सुरु राहील.
जोहॅरीविंडोच्या चार भागांची माहिती आपण मागील लेखात पाहिली आहेच. प्रकट स्व चे क्षेत्र विस्तारीत करण्यासाठी आणि इतर क्षेत्रांची व्याप्ती कमी करण्यासाठी पुनर्भरण अर्थातच फीडबॅक आणि स्व-प्रकटन(सेल्फ डिस्क्लोजर) हे दोन मार्ग या प्रारुपात सांगितले आहेत.
फीडबॅक म्हणजे एखादी वस्तू, व्यक्ती, प्रसंग इ. बद्दलचे माघारी येणारे वृत्त वा त्याच्याबद्दल समोरच्याला मुद्दाम दिली जाणारी माहिती असे म्हणता येईल. पहा हं, एखादा सेल्समन दुकानदाराला सांगतो अमुक एक गोष्ट दिली आहे ना त्याचा फिडबॅक आवश्य द्या..दोन आठवड्यांनी येतो हां. दुकानदार ग्राहकाला अमुक एक वस्तू वापरुन पहा..सांगा हं कशी वाटली? असे सांगतो. हे सांगताना त्या व्यक्तीने जो असेल तो फीडबॅक देणे अपेक्षित असते.
आपला पाल्य कशी प्रगती करतो आहे, त्यामध्ये काय सुधारणा होणे आवश्यक आहे हा फीडबॅक पालक शिक्षकांकडून घेऊन तशा दृष्टीने मुलाच्या प्रगतीसाठी काय करता येईल हे पाहतात, सुधारणेसाठी आवश्यक गोष्टी कशा पद्धतीने करायला हवी हे सांगतात. तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन घेतात.
प्रत्येक क्षेत्रात, बहुतांश सर्वांनाच फीडबॅक हवा असतो. औद्योगिक क्षेत्रात तर हा शब्द नेहमी ऐकायला मिळतो.
परंतु फीडबॅक देताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्याचा उपयोग हा टीकात्मक किंवा केवळ दोष दाखविण्याच्या हेतूने नसावा. सूचना अशा असाव्यात की समोरच्याला न दुखावता विधायक स्वरुपाचा बदल घडून येण्यास सहाय्य होईल.
अगदी साधं उदाहरण पाहुया. नव्यानेच लग्न झालेली मालन. काहीतरी स्पेशल करावे म्हणून तिने हौशीने गुलाबजाम केले. दीरांनी एक गुलाबजाम तोंडात टाकला आणि छॅ...हा गुलाबजाम आहे की मेण..ना चव ना ढव..शॅ..अगदीच बकवास..अगदी फालतु. अशी शेरेबाजी करत नाराजी व्यक्त केली. मालन रडवेली झाली. तिच्या सासुबाईंनी मात्र तिला सांभाळून घेत म्हटले, ‘अगं, मालन हे असं होतं..तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको..अगं मी नवीन असताना तर मी केलेला शिरा असा काही बिघडला होता की काही विचारु नको..असं म्हणत त्यावेळेचा त्यांनी एक गमतीदार किस्सा मालनला सांगितला. अगं सुरवातीला अंदाज नसतो आपल्याला..सरावाने आपोआप जमतं बघ! तू कशाला काळजी करतेस. मी आहे ना. आपण दोघींनी मिळून करुया स्वयंपाक.. हळूहळू बघ कशी एक्सपर्ट होशील. मालन अगदी मनापासून हसली आणि तिने मानही डोलावली. सासुबाईंनी तिला छान समजावून सांगितले. मालन रिलॅक्स झाली परंतु दीराच्या शेरेबाजीमुळे त्यांच्या विषयी तिच्या मनात नकळत अढी निर्माण झाली आणि सासूबाईंबद्दल मात्र जवळीक वाटू लागली. दिराने टिकात्मक दिलेल्या या फिडबॅकमुळे मालन दुखावली गेली होती.
आपण देत असलेला फिडबॅक परस्परसंबंध बिघडवणारा नसावा. एखाद्या गोष्टीची चिरफाड करणारा नसावा तर काय बदल अपेक्षित आहे हे अगदी योग्य पद्धतीने व्यक्त होत सांगायला हवे.
फीडबॅकचा योग्य प्रकारे उपयोग करुन अंध स्वचे क्षेत्र कमी करुन प्रकट स्वचे क्षेत्र वाढवता येते. आपल्यातील दोष, उणिवा कमी करुन परस्परसंबंधात खुलेपणा आणता येतो. मात्र फीडबॅक देताना योग्य वेळी दिला जावा आणि समोरची व्यक्ती स्वीकारण्याच्या मन:स्थितीत असताना द्यावा. जेव्हा दोन्ही व्यक्ती प्रकट स्वक्षेत्रातून कार्यरत असतील तेव्हा हा फीडबॅक अधिक परिणामारक ठरेल.
स्व प्रकटन
स्व प्रकटन या मार्गाने देखील प्रकट स्व चे क्षेत्र वाढवता येतं. मागच्या लेखात म्हटल्या प्रमाणे खाजगी अथवा सुप्त स्व असलेली व्यक्ती स्व:बद्दल बोलत नाही. इतरांना आपल्याबद्दल माहिती आहे हे गृहीत धरुनच चालत असतात. अरे, मला वाटले तुम्हाला माहिती असेल हे त्यांचे परवलीचे वाक्य असते. पण यामुळे दुसऱ्याची मात्र गडबड उडते. उदा. समजा एखादी व्यक्ती आपल्याकडे येणार आहे आपण छान पुरणपोळ्या करुन ठेवल्या. जेवायला बसताना मात्र..अरे..मी गोड बिल्कुलच खात नाही मला शुगर आहे.
अरे देवा..अहो मी विचारले तेव्हा सांगायचे तरी..तुम्ही म्हणालात काहीही करा वहिनी सगळं आवडतं.
अरे मला शुगर आहे तुम्हाला माहित नाही? मला वाटले तुम्हाला माहिती असेल..अलीकडे फार वाढलेली त्यामुळे गोड तसं पूर्णपणे बंदच केलंय. झाली गडबड आणि तारांबळ...आयत्यावेळी त्या गृहिणीची कसरत सुरु...किंवा काही वेळा असं व्हावं की कुणी येणार आहे म्हणून आपण सर्व करुन ठेवावं आणि एखाद्याचा उपवास असावा..सांगितले नाही तर कळणार कसे? आयत्यावेळी जर ते सांगितले तर मात्र मग गडबड होते. सुप्त स्व वाल्यांचे असे असंख्य किस्से सांगता येतील. अशा स्वभावाने गोंधळ तर होतोच परंतु गैरसमजही निर्माण होतात. काही वेळा नात्यावर त्याचे प्रतिकूल परिणाम होतात. आपल्या आवडीनिवडी, छंद, कौटुंबिक, शैक्षणिक माहिती, आपले कलागुण याविषयी समोरच्या व्यक्तीला योग्य पद्धतीने व्यक्त होत माहिती दिलेली असली तर गडबड, गोंधळ, गैरसमज, विरस होणे या गोष्टी घडण्याची शक्यता फार कमी उरते.
मात्र स्वत:बद्दलची माहिती केव्हा, कुठे, कशी, किती द्यावी याबाबत मात्र आपण भान राखायला हवे. नाहीतर वेगळे गोंधळ होऊ शकतात. उदा. शामरावांना बोलायची खूप आवड. दारावरती आलेल्या विक्रेत्यासोबत शामराव अगदी भरभरुन बोलले. बोलण्याच्या ओघात आपण कसे श्रीमंत आहोत परंतु आम्ही दोघे कसे एकटेच राहतो. इथे कुणाचाच आधार नाही हे बरीच उदाहरणे देत सांगितले. त्यात आता कंटाळा आलाय म्हणून आठ दिवस आम्ही कसे बाहेर जाणार आहोत हे ही सांगितले. झालं..शामराव फिरायला बाहेर गेले खरे परंतु आले तेव्हा घरात चोरी झाली होती. चोरांचा थांगपत्ता लागला नाही. शामरावांना इतर कुणाची साथ सोबत नव्हती परंतु आपण माहिती सांगितल्यामुळे असे झाले का? ही खंत मात्र शामरावांची सोबत पुढे बराच काळ करत राहिली.
काही अत्यंत खाजगी गोष्टी, गुपिते भावनेच्या भरात उत्साहाने सांगणे गोत्यात आणू शकते. त्यामुळे सजग रहात योग्य रितीने व्यक्त व्हायला हवे.
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो हे लक्षात घेत फीडबॅक आणि स्व-प्रकटन योग्य प्रमाणात करायला हवे. आपले इतरांसोबतचे नातेसंबंध फीडबॅक आणि स्वप्रकटन योग्य प्रमाणात झाल्यास दृढ होतील हे मात्र निश्चीत!!
अॅड. सुमेधा संजीव देसाई