महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ब्रह्माचे स्वरूप समजून घेणे फार महत्त्वाचे आहे

06:01 AM May 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

बाप्पा सांगतात की, परब्रह्म मीच असून नाना प्रकारची बुद्धी व मोहमयी सिद्धी असे माझ्या मायेचे स्वरूप आहे. या मायेच्या प्रभावामुळे मनुष्य षड्रिपूंच्या कचाट्यात सापडून जन्ममृत्युच्या फेऱ्यात अडकतो.

Advertisement

ही माया सर्वदा माणसाला कामक्रोधादि सहा विकारांचा गुलाम करून टाकते. हे असे अनेक जन्म चालू असते पण कुठलीही गोष्ट अती झाली की तिचा वीट येतो त्याप्रमाणे अनेक जन्मांच्या प्रवासानंतर माणसाला हळूहळू विषयोपभोगांचा कंटाळा येऊ लागतो. तसेच त्यातून मिळणारे सुख हे तात्पुरते आहे हे जाणवले की, त्याला कायम टिकणाऱ्या सुखाची ओढ लागते.

तसं बघितलं तर सर्वांनाच आपण कायम सुखात रहावं असं वाटत असतंच पण सुरवातीला गैरसमज झाल्याने मनुष्य विषयात सुख आहे असं समजून त्यांच्या पाठीमागे लागतो परंतु कालांतराने त्याच्या लक्षात येते की, विषयातून मिळणारे सुख कायम टिकणारे नसून ते ईश्वराचे स्वरूप जाणून घेण्यात आहे.

हे लक्षात आल्यावर त्याला ईश्वराचं आनंदी स्वरूप जाणून घ्यायची इच्छा होते. त्यादृष्टीने त्याने प्रयत्न सुरु केले की, आत्तापर्यंत आपण कर्ते आहोत ह्या विचारातून करत असलेल्या कृतीमुळेच आपल्याला षड्रिपुंनी घेरल्याचे त्याच्या लक्षात येते. एकदा ईश्वर कर्ता आहे हे मान्य केले की, त्याच्यावर असलेली काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर या षड्रिपुंची सत्ता हळूहळू कमी व्हायला लागते. मी कर्ता नसून ईश्वर सर्व गोष्टी माझ्याकडून करून घेत आहे मग इच्छा करून त्या पूर्ण झाल्या नाहीत तर मी दु:ख करतोय? असे विचार मनात येऊ

लागतात.

परिणामी तो निरपेक्षतेकडे झुकू लागतो. योग्य काय, अयोग्य काय हे लक्षात येऊन त्याबरहुकूम कारवाई करण्यासाठी त्याची बुद्धी अनुकूल होते. त्याचा विवेक जागृत होतो. अर्थातच माणसाच्या बुद्धीतला हा बदल सहजासहजी होत नसल्याने तो घडून यायला अनेक जन्म जावे लागतात. याजन्मी जेव्हढी प्रगती झाली असेल त्यापुढील टप्प्यावरची उपासना पुढील जन्मात सुरू होते. आणखी सांगायचं विशेष म्हणजे, ईश्वरी स्वरूपाची प्राप्ती म्हणजे शाश्वत आनंदाचा ठेवा एकाच जन्मात प्राप्त होईलच असं नसलं तरी, त्या दिशेनं केलेला प्रवास हा तितकाच आनंददायक असतो.

या जन्मी केलेली साधनाच फक्त पुढील जन्मात बरोबर येते हे लक्षात आलं की, मनुष्य झपाटून जाऊन ईश्वराच्या भेटीसाठी प्रयत्न करू लागतो. अर्थात हा अनेक जन्मांचा प्रवास असल्याने निष्ठापूर्वक मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. याचा शेवट ब्रह्मप्राप्तीत होतो. बाप्पा पुढे या ब्रह्माचे स्वरूप सांगत आहेत.

विरज्य विन्दति ब्रह्म विषयेषु सुबोधत: ।

अच्छेद्यं शस्त्रसङ्घातैरदाह्यमनलेन च ।। 31 ।।

अर्थ-मायापटलाचा नाश करून बोधपूर्वक विषयवासनांमधून मुक्त होत साधक ब्रह्मपदास प्राप्त करून घेतो. अशा ब्रह्मरूप झालेल्या साधकाला म्हणजे ब्रह्मस्वरुपाला शस्त्राने छेदणे वा अग्नीने दहन करणे अशक्य आहे. ब्रह्माचे स्वरूप समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. त्याचे चिरंतनत्व लक्षात आले की, क्षणभंगुर गोष्टींसाठी केलेली धडपड क:पदार्थ वाटू लागते. ब्रह्माचे आणखीन वैशिष्ट्या असे की,

अक्लेद्यं भूप भुवनैरशोष्यं मारुतेन च

अवध्यं वध्यमाने पि शरीरे स्मिन्नराधिप ।। 32 ।।

अर्थ- राजा, ह्या ब्रह्मावर कशाचाही परिणाम होत नाही. ते पाण्याने भिजत नाही, वायूने शोषले जात नाही, त्याचा वधही करता येत नाही. देह नष्ट करण्याचे जेव्हढे म्हणून प्रकार आहेत त्या सर्वांचा उल्लेख वरील दोन श्लोकात बाप्पांनी केलेला आहे परंतु ब्रह्मस्वरूपाचा जन्मच होत नसल्याने त्याला मृत्यूचे भय नसते. त्यामुळे त्याचा कोणत्याही उपायाने नाश होत नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article