कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी -भूमिगत डस्टबिन
शहरात 24 ठिकाणी कार्यान्वित : सुरतनंतर बेळगावात सुरुवात : कचरा समस्या दूर होणार
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेने शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी शहरातील विविध भागात भूमिगत डस्टबिन बसविण्यात आले आहेत. हा प्रयोग पहिल्यांदा सुरतमध्ये करण्यात आला असून, या पाठोपाठ आता बेळगावातही भूमिगत डस्टबिन बसविण्यात आले आहेत. 15 व्या वित्त आयोग योजनेतून पहिल्या टप्प्यात बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात 24 ठिकाणी भूमिगत डस्टबिन बसविण्यात आले आहेत. डस्टबिनमधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 1.85 कोटी रुपये किमतीचे हैड्रोलिक क्रेनवर आधारित वाहन खरेदी करण्यात आले आहे. बेलिंग मशीन, प्लास्टिक स्टंडींग मशीन, जेसीबीप्रमाणे लोडर वापरण्यात येत आहेत.
एका भूमिगत डस्टबिनच्या बांधकामासाठी 6.5 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. क्रेनच्या साहाय्याने कंटेनर उचलण्याची व्यवस्था आहे. या सर्व प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी योजनेतून विश्वेश्वरय्यानगरमध्ये बांधण्यात आलेल्या कमांड अॅण्ड सेंटरमधून यावर नियंत्रण ठेवले जाते. बसविण्यात आलेल्या कंटेनरमध्ये मॅन्युअली कचरा टाकण्यासाठी वरच्या बाजूला छिद्र ठेवण्यात आले आहे. पायाने पॅडल दाबल्यास छिद्र खुले होते. त्यानंतर त्याच्यात कचरा टाकला जाऊ शकतो.
दुर्गंधीदेखील दूर होण्यास मदत
जमिनीत ठेवण्यात आलेल्या कंटेनरमध्ये जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हैड्रोलिक क्रेन वापरून कंटेनर वाहनात उचलून ठेवण्याची व्यवस्था आहे. शहरात सर्वत्र भूमिगत डस्टबीन बसविल्यास कचरा समस्या दूर होणार आहे. कचऱ्यावर वावरणारी डुकरे, कुत्री आणि भटकी जनावरे यांना देखील आवर घालता येऊ शकतो. त्याचबरोबर कचऱ्यामुळे पसरणारी दुर्गंधी दूर होण्यास मदत होणार आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
याठिकाणी आहेत भूमिगत डस्टबिन
शहापूर आनंदवाडी पी. के. क्वॉर्टर्स, खासबाग ओल्ड पी. बी. रोड, वडगाव ओमकारनगर, छत्रपती शिवाजी उद्यान रोड, उद्यमबाग उत्सव हॉटेलनजीक, शहापूर स्मशान रोड, धामणे रोड वडगाव, अनगोळ आंबेडकर गल्ली, झटपट गल्ली, बाबले गल्ली, संत रोहिदास कॉलनी, मजगाव रोड, मजगाव कन्नड सरकारी शाळा, भाग्यनगर चौथा क्रॉस, अनगोळ नाला, खानापूर मुख्य रोड इंडियन ऑईलनजीक, टिळकवाडी बुधवारपेठ, गोवावेस, जक्कीनहोंडा, हिंदवाडी कुस्ती आखाडा, हिंदवाडी लिंगायत क्रिमिशन ग्राऊंड, शांतीनगर नाल्यानजीक, मंडोळी रोडवर भूमिगत डस्टबिन बसविले आहेत.उत्तर मतदारसंघात 10 ठिकाणी भूमिगत डस्टबिन बसविण्यासाठी ठेकेदाराला मनपातर्फे सूचना केली आहे.