निरोगी आरोग्यासाठी नियमित चाचण्या, उपचार घ्या!
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आवाहन : हरवळे ‘हेल्थ विथ आयुर्वेद’ शिबिर
सांखळी : आजच्या जमान्यात विविध कारणांमुळे वाढत चाललेले आजार व शारिरीक व्याधी या आपणास होऊ नये यासाठी आपण सजग राहताना नियमित चाचण्या व उपचार घेणे आवश्यक आहे. गोव्यात सध्या विविध आजार वाढत असल्याने भविष्यात डायलिसिस युनिट पंचायत पातळीवर येऊ नये, यासाठी आपण चिंताग्रस्त आहे. हे युनिट केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंतच मर्यादित रहावे अशीच आपली इच्छा आहे. राज्यभर चालणाऱ्या या ‘हेल्थ विथ आयुर्वेद’ या शिबिरात सहभागी होऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. असाध्य रोगांपासून आपला बचाव करून घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
हरवळे सांखळी येथे फिजिओथेरपी महाविद्यालयात आयोजित हेल्थ विथ आयुर्वेद या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आरोग्यमंत्री विश्वजित राणे, डॉ. मिनल जोशी, डॉ. मेधा साळकर, ऑल इंडिया काऊंसिल आयुर्वेदच्या डीन डॉ. सुजाता कदम, डॉ. स्नेहा भागवत, धर्मेंद्र, डॉ. नीलेश कोरडे, डॉ. नितीन मांद्रेकर, डॉ. मिथुन बोंद्रे, पांडुरंग कुट्टीकर, डॉ. अतुल पै बीर, वल्लभ साळकर, नगरसेवक यशवंत माडकर, सुशांत रायकर आदींची उपस्थिती होती.
दिनचर्या, ऋतुचर्या पाळावा
आम्ही दिनचर्या, ऋतुचर्या जर पाळली नाही तर आम्हाला येणाऱ्या काळात विविध रोगांचा सामना करावा लागू शकतो. गोव्यात विविध प्रकारचे औषधोपचार व औषधे उपलब्ध आहेत. परंतु आपणास आजारच होऊ नये, यासाठी आपण सतर्क व सजग रहायला हवे. त्याचसाठी संपूर्ण गोवाभर हे शिबिर सुरूच राहणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
मुख्यमंत्री लोकांच्या आरोग्याबात गंभीर
मुख्यमंत्री नेहमीच सार्वजनिक आरोग्याबाबत गंभीर असतात. त्याच अनुषंगाने लोकांना आजार होऊ नये, यासाठी वावरत आहेत. त्यात आयुर्वेदाची भूमिका मोठी आहे. आज जगात आयुर्वेदाला महत्त्व दिले जात असून आरोग्याची पूर्वकाळजी घेण्यासाठी जगातील लोक आयुर्वेदाकडे वळत आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत सांखळीमध्ये आयुर्वेदाशी संलग्न प्रशिक्षण सुरू करून राज्याचे भविष्यात निरोगी राखण्याचे ध्येय बाळगले आहे, असे यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी म्हटले.
गेल्या दहा वर्षांपूर्वी गोव्याची परिस्थिती व आजची परिस्थिती बरीच बदलली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा बरीच प्रगती करीत आहे. लोकांना कशा प्रकारच्या साधनसुविधा व सेवा अपेक्षित आहे याचा विचार करून निर्णय घेतले जात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपणासही काम करायला मिळत असल्याने ते आपले भाग्य आहे. सांखळीलाही असे नेतृत्व लाभल्याबद्दल सांखळीवासीयही भाग्यवान आहेत, असेही यावेळी मंत्री राणे म्हणाले. मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिबिरात रुग्णांना तपासून सेवा दिली. स्वागत पांडुरंग कुट्टीकर यांनी केले.