शहरात लवकरच अंडरब्रिज-ओव्हरब्रिज
यंत्रसामग्रीच्या वाहतुकीसाठी काढण्यात आल्या निविदा
बेळगाव : टिळकवाडी व अनगोळ येथील रेल्वेगेटवर लवकरच पूल बांधण्याच्या कामांना सुरुवात होणार आहे. टिळकवाडी दुसरे रेल्वेगेट येथे उड्डाणपूल तर अनगोळ चौथे रेल्वेगेट येथे रोड अंडरब्रिज करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने या दोन उड्डाणपुलांच्या कामांना मंजुरी दिली असून येथील यंत्रसामग्री इतर ठिकाणी पाठविण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने निविदाही काढण्यात आल्या आहेत. बेळगाव महानगरपालिकेने दुसरे रेल्वेगेट येथील रेल्वेची साधनसामग्री-युटीलिटी शिफ्टींगसाठी 49 लाख 48 हजार रुपयांच्या निविदा मागविल्या आहेत. यासाठी तीन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
संबंधित कंत्राटदाराने तीन महिन्यांमध्ये हे सर्व साहित्य दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे आहे. दोन महिन्यांपूर्वी नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी सर्वेक्षण केले होते. अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट येथे रोड अंडरब्रिज होणार आहे. यासाठी महापालिकेने 53 लाख 82 हजार रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. निविदा काढण्यात आल्याने याठिकाणी लवकरच ब्रिजच्या कामाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. तानाजी गल्ली रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद करण्यात आल्याने तेथील उड्डाणपुलाचे काम रद्द करण्यात आले आहे. सध्या शहरात दोन ठिकाणी रेल्वेचे पूल होणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होणार आहे. परंतु टिळकवाडी येथे पहिले रेल्वेगेट परिसरात बॅरिकेड्स असल्याने सध्या वाहतूक दुसऱ्या रेल्वेगेट मार्गे वळविण्यात आली आहे. परंतु त्या रेल्वेगेटचे काम सुरू झाल्यास पहिले रेल्वेगेट परिसरात वर्दळ वाढणार आहे.