कोणत्याही परिस्थितीत तानाजी गल्लीत रेल्वे ओव्हरब्रिज नको
नागरिकांची मागणी : रेल्वे खाते-खासदारांकडून रेल्वेगेटची पाहणी
बेळगाव : तानाजी गल्ली येथे रेल्वे ओव्हरब्रिज कोणत्याही परिस्थितीत नको, अशी भूमिका परिसरातील नागरिकांनी खासदार जगदीश शेट्टर यांच्यासमोर मांडली. ओव्हरब्रिजमुळे आसपासच्या उद्योगांसह घरांनाही फटका बसणार असल्याने हवे तर रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद ठेवा. परंतु ओव्हरब्रिज नको, अशी भूमिका घेतल्याने खासदारांनीही आपण नागरिकांच्या मागणीचा विचार करू, असे आश्वासन दिले. खासदार जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी दुपारी तानाजी गल्ली येथील रेल्वेगेटची पाहणी केली. नैर्त्रुत्य रेल्वे विभागाचे हुबळी येथील वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. रेल्वेगेटची पाहणी करण्यापूर्वी शेट्टर यांनी नागरिकांची मते जाणून घेतली. परिसरातील नागरिकांनी रेल्वे ओव्हरब्रिजच्या मागणीला विरोध दर्शविला.
गल्ली अरुंद असून रेल्वे ओव्हरब्रिज झाल्यास समस्या वाढणार आहेत. तानाजी गल्लीच्या एका बाजूला कपिलेश्वर ओव्हरब्रिज तर दुसऱ्या बाजूला धारवाड रोड ओव्हरब्रिज असल्याने याठिकाणी ओव्हरब्रिजची गरज नाही. रेल्वे विभागाला रेल्वेगेटबाबत काही अडचणी असल्यास त्यांनी रेल्वेगेट कायमचा बंद करावा, अशी विनंती नागरिकांनी खासदार शेट्टर यांच्यासमोर व्यक्त केली.
तानाजी गल्ली रेल्वेगेट करण्याबाबत हालचाली गतिमान झाल्याने नागरिकांनी तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच महानगरपालिकेला निवेदन देऊन ओव्हरब्रिज करू नये, अशी मागणी केली होती. कपिलेश्वर व धारवाड रोड येथील ओव्हरब्रिजमुळे परिसरातील उद्योग पूर्णपणे ठप्प झाले आहेत. अशी वेळ येथील नागरिकांवर येऊ नये, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ओव्हरब्रिज नको, अशी भूमिका मांडण्यात आली. खासदार जगदीश शेट्टर यांनी नागरिकांची बाजू ऐकून घेतली. नागरिकांच्या विनंतीचा विचार करू, लोकप्रतिनिधी असल्याने नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणेच ओव्हरब्रिजबाबत कार्यवाही होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी माजी आमदार अनिल बेनके, भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, राहुल मुचंडी यांच्यासह नागरिक व नगरसेवक उपस्थित होते.