भारताच्या 17 वर्षांखालील मुली बांगलादेशविऊद्ध कठोर परीक्षेसाठी सज्ज
वृत्तसंस्था/ पोखरा
पोखरा रंगासाला स्टेडियमवर आज सोमवारी पामेला कॉन्टीच्या 17 वर्षांखालील संघाचा सॅफ 19 वर्षांखालील महिला अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरा सामना बांगलादेशच्या मजबूत संघाशी होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस चीनमध्ये होणाऱ्या एएफसी 17 वर्षांखालील महिला आशियाई चषकाच्या तयारीचा भाग म्हणून भारताने 17 वर्षांखालील संघाला मैदानात उतरवले आहे.
भारताने यजमान नेपाळवर 1-0 असा संघर्षपूर्ण विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुऊवात केली. बांगलादेशविऊद्धचा आणखी एक विजय मिळाल्यास आणि भूतानला नंतरच्या सामन्यात नेपाळला हरवण्यात अपयश आल्यास भारताचे विजेतेपदाच्या लढतीत स्थान निश्चित होईल. भारतीय मुलींना नेपाळने जोरदार धक्का दिला होता आणि 49 व्या मिनिटाला निर्णायक गोलाची नोंद झाली होती. 16 वर्षीय स्ट्रायकर पर्ल फर्नांडिसने 17 वर्षांखालील राष्ट्रीय संघासाठी तिचा 10 वा गोल केला. पहिल्या सामन्याचा विचार करता मुख्य प्रशिक्षक कॉन्टी यांना असे वाटते की, मुली खेळण्यास उत्सुक होत्या, पण त्याचबरोबर त्यांच्या प्रणालीशी जुळवूनही घेत होत्या.
माझ्या मतानुसार मी नवीन प्रशिक्षक असल्याने खेळाडूंना अधिक योगदान देण्याची आणि स्वत:ला सिद्ध करण्याची तीव्र इच्छा होती. त्या अजूनही संघात त्यांच्या स्थानावर पूर्णपणे सुरक्षित नाहीत आणि त्या अधिक योगदान दाखवू इच्छितात, ज्यामुळे आमच्याकडून नेहमीपेक्षा जास्त चुका झाल्या. एकंदरित मी आनंदी आहे, कारण मी चांगल्या गोष्टी पाहिल्या. पण अशा काही गोष्टी देखील होत्या ज्या इतक्या चांगल्या नव्हत्या, ज्यावर काम करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.
अन्नपूर्णा हिमालयीन पर्वतरांगांची नयनरम्य पार्श्वभूमी असूनही पोखरा मैदानाच्या परिस्थितीने भारताच्या शैलीला आव्हाने निर्माण केली आहे. ‘मैदानाच्या गुणवत्तेचा आमच्यावर खूप परिणाम झाला. त्यामुळे चेंडू नियंत्रणात ठेवणे आणि पासिंगसह खेळणे खूप कठीण बनले. आमच्याकडे तांत्रिकदृष्ट्या कुशल खेळाडू आहेत आणि त्या बाबतीत आम्ही नेपाळपेक्षा श्रेष्ठ आहोत. पण परिस्थितीने निश्चितच भूमिका बजावली’, असे सदर इटालियन खेळाडू पुढे म्हणाल्या.
आता लक्ष बांगलादेशकडे आहे, ज्यांनी भूतानवर 12-0 असा विजय मिळवून स्पर्धेत प्रवेश केला आहे आणि त्यांच्याविरुद्ध खेळताना भारताची अधिक कठोर शारीरिक परीक्षा लागेल, अशी अपेक्षा आहे. ‘मला वाटते की, बांगलादेश शारीरिवदृष्ट्या एक मजबूत प्रतिस्पर्धी आहे. हे लक्षात घेण्याची गरज आहे. पण मला वाटते की, तांत्रिकदृष्ट्या जर आम्ही चांगले काम केले, तर आम्ही त्यांना खूप नुकसान पोहोचवू शकतो’, असे कॉन्टी यांनी सांगितले.