तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून बिनशर्त माफी
सर्वोच्च फटकार बसल्यावर बॅकफूटवर
वृत्तसंस्था/हैदराबाद
सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे बॅकफूटवर आले आहेत. रेड्डी यांनी शुक्रवारी वक्तव्य जारी करत सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. भारतीय न्यायपालिकेबद्दल मला सर्वोच्च सन्मान आणि पूर्ण विश्वास आहे. 29 ऑगस्ट रोजीच्या काही वृत्तांमध्ये माझ्या नावाने करण्यात आलेल्या टिप्पणींमुळे न्यायालयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याची जाणीव झाली. परंतु न्यायप्रक्रियेवर मी दृढ विश्वास ठेवतो याचा पुनरुच्चार करू इच्छितो असे रेड्डी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
वृत्तांमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या वक्तव्यांसाठी मी बिनशर्त माफी मागतो. अशा वृत्तांमध्ये माझ्या नावाने करण्यात आलेल्या टिप्पणींचा उल्लेख चुकीच्या संदर्भाने करण्यात आला आहे. न्यायपालिका आणि त्याच्या स्वातंत्र्याबद्दल माझ्या मनात सन्मान आणि सर्वोच्च आदर असल्याचा दावा रेड्डी यांनी केला आहे. भाजप आणि बीआरएस यांच्यात लोकसभा निवडणुकीत झालेल्या तडजोडीनुसार के. कविता यांना पाच महिन्यांमध्येच जामीन मिळाला. तर मनीष सिसोदिया यांना 15 महिन्यांनी जामीन मिळू शकला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अद्याप तुरुंगात आहेत अशी टिप्पणी रेड्डी यांनी केली होती. रेड्डी यांच्या या टिप्पणीवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. रेड्डी हे एका घटनात्मक पदावर आहेत, तरीही त्यांनी अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केले आहे. न्यायालय नेत्यांना विचारून नव्हे तर कायद्यानुसार निर्णय घेते. आमच्या निर्णयांबद्दल कुठला नेता काय म्हणू इच्छितो याने आम्हाला फरक पडत नसल्याचे न्यायाधीश बी.आर. गवई यांनी सुनावले होते.
के. कविता या दिल्लीच्या अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी आरोपी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 27 ऑगस्ट रोजी याप्रकरणी कविता यांना जामीन मंजूर केला होता. सीबीआय-ईडीचा तपास पूर्ण झाला असल्याने कविता यांना कोठडीत ठेवण्याची गरज नाही. कविता 5 महिन्यांपासून कोठडीत आहेत, याप्रकरणी 493 साक्षीदार आहेत, 50 हजार दस्तऐवज आहेत. अशा स्थितीत सुनावणी लवकर पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने जामीन दिला जात असल्याचे न्यायाधीश गवई अणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने म्हटले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री रेड्डी यांनी टिप्पणी केली होती. बीआरएसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी काम केले आहे. कविता यांना बीआरएस आणि भाजपमधील तडजोडीमुळेच जामीन मिळाल्याची चर्चा असल्याचे रेड्डी म्हणाले होते. या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत रेड्डी यांना गुरुवारी फटकारले होते.