For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुतण्याच्या खूनप्रकरणी चुलत्यास 10 वर्षे सक्तमजुरी

04:20 PM Mar 01, 2025 IST | Radhika Patil
पुतण्याच्या खूनप्रकरणी चुलत्यास 10 वर्षे सक्तमजुरी
Advertisement

वडूज : 

Advertisement

म्हासुर्णे (ता. खटाव) येथे पाटाचे पाणी पाजण्याच्या कारणावरून रागाच्या भरात चुलत्याकडून पुतण्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पांडुरंग बाळकू यमगर (वय :76) या नराधम चुलत्यास दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी, 8 मे 2014 रोजी म्हासुर्णे येथील यमगर वस्तीवरील भवानी मंदिराजवळ आरोपी पांडुरंग यमगर याने उरमोडी पाटाचे तात्पुरत्या सोडलेल्या पाटाचे पाणी त्याचे जमिनीचे बाजूने जाणारे चर मधून वाहत असताना ते आरोपीचे शेताकडे जात असताना यातील मयत राजेंद्र सिताराम यमगर (वय 32) याने अडवून चर खोदून आपले पिकाकडे वळवले. याचा राग मनात धरून मयत हा खाली वाकून पाणी वळवत असताना बेसावध असताना यातील आरोपी याने आपले हातातील खोरे घेऊन येऊन तू माझ्या शेताकडे जाणारे पाणी का अडवतोस असे म्हणून त्याचे डोकीत खोरे उलटे धरून खोऱ्याचा तुंबा जोरात मारला व खोरे घेऊन तो बडबड करीत स्वत:च्या वस्तीकडे निघून गेला. यातील मयत राजेंद्र सिताराम यमगर यास डोक्यास जबर मार लागून त्याचे कवटीचे हाड तुटून मेंदूस गंभीर दुखापत झाली. त्यानंतर मयत यांचा उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Advertisement

या गुह्यात पो.उप.नि वडूज एस. जी. दळवी यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालय, वडुज येथे दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील वैभव हरीश काटकर यांनी काम पाहिले. त्यांना वडूज येथिल अॅड. प्रशांत नारायण पाटील यांनी सहकार्य केले.

यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने 8 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीशसो आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपीला सदोष मनुष्यवध भा..वि.स कलम 304(1) अन्वये दोषी ठरवून आज दि. 28 रोजी आरोपी पांडुरंग बाळकू यमगर (मयताचे चुलते) रा. म्हासूर्णे यास भा..वि.स कलम 304 (1) अन्वये 10 वर्ष सक्तमजुरी व 5000 रू दंड व दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.

सदर खटला चालवणे कामी सरकारी वकील वैभव काटकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पो. नि. घनश्याम सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉड पो. उप. नि. दत्तात्रय जाधव, . पो. हवा. विजयालक्ष्मी दडस, पो. सागर सजगणे, पो. कॉ. जयवंत शिंदे, पो. कॉ. अमीर शिकलगार यांनी सहकार्य केले.

Advertisement
Tags :

.