Hiranyakeshi River | काळजाचा ठोका चुकवणारा प्रवास! मामाला सोडायला गेला अन् भाच्यासह दोघांचाही करुण अंत; नक्की काय घडलं?
हिरलगे-कोवाडे बंधाऱ्याजवळ दुचाकी आढळली
भादवण -हिरलगे येथून पाहुण्यांकडून कोबाडे, (ता. आजरा) गावाकडे येताना कोबाडे-हिरलगे दरम्यानच्या बंधाऱ्याजवळ हिरण्यकेशी नदीपात्रात बुडून सुनील विष्णू सुतार (वय ४८, रा. कोबाडे, ता. आजरा), प्रवीण पांडुरंग सुतार (वय ३५, रा. वाळकी, ता. चिक्कोडी, जि. बेळगांव) या मामा-भाच्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबतची वर्दी दीपक सुतार यांनी आजरा पोलिसात दिली.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रवीण यांचे सासरे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हिरलगे (ता. गडहिंग्लज) येथे होता. या कार्यक्रमासाठी प्रवीण कुटुंबियांसह मुंबईहून हिरलगे येथे आले होते. तर सुनील सुतार हे याच कार्यक्रमासाठी कोवाडे येथून हिरलगे येथे गेले होते. येथील कार्यक्रम आटोपून दुचाकीने प्रवीण मामा सुनील यांना कोवाडे येथे सोडण्यासाठी येत होते.
हिरलगे-कोवाडे दरम्यान हिरण्यकेशी नदीवर असलेल्या बंधाऱ्यावरून अंतर जवळ असल्याने बंधाऱ्यापर्यंत मामा सुनील यांना सोडून येतो असे पाहुण्यांना सांगून प्रवीण दुचाकी घेऊन आले होते. सोमवार दि. ११ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडलेले मामा-भाचे रात्री उशिरापर्यंत ना हिरलगे येथे ना कोवाडे येथे पोहोचले. तर त्यांचा मोबाईलवरून संपर्कही होत नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली.
हिरलगे-कोवाडे बंधाऱ्यानजीवक दुचाकी उभी असलेली निदर्शनास आल्यानंतर नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकला. रात्रीच्या अंधारात शोध घेणे अडचणीचे ठरले. मंगळवारी सकाळी नदीपात्रातून सुनील व प्रवीण यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आजरा उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.हिरलगे-कोवाडे दरम्यानचा बंधाऱ्याचे काम अर्धवट झाले आहे.
हिरलगे कडील बाजूने काही पिलवर स्लॅब टाकण्यात आला असून पुढे स्लॅ ब टाकलेला नाही. पाण्यातील पिलरला दोन फूटांचे पॅराफीट सोडण्यात आले आहे. मात्र सतत हे पॅराफीट पाण्यात असल्याने शेवाळलेले असते. त्यावरूनच अंतर कमी असल्याने माणसांची ये-जा सुरू असते. तशाच पद्धतीने सुतार येत असावेत. पाय घसरून त्यांचा तोल गेल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात प्रवीण यांचाही मृत्यू झाला असावा अशी शक्यता नातेवाईकांकडून व्यक्त केली.