मालीम येथील खाजगी जेटीबद्दल अनभिज्ञ
प्रसारमाध्यमांतून मिळाली माहिती : पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्याकडून स्पष्ट
पणजी : नावशी येथील नियोजित मरिना प्रकल्पास संपूर्ण मतदारसंघ आणि राज्यभरातील पर्यावरणप्रेमींकडून होणाऱ्या जोरदार विरोधाच्या पार्श्वभूमीवर आता तसाच प्रकल्प खुद्द राजधानी जवळील मालीम जेटीच्या क्षेत्रात उभारण्यात येणार असल्याचे वृत्त पसरल्याने खळबळ माजली आहे. मात्र स्थानिक आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या प्रकल्पाबद्दल आपणास काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे. मालीम जेटीच्या परिसरात सध्या मुंबईस्थित एका खाजगी कंपनीकडून सुमारे 8 कोटी गुंतवणूक करून मरिनाच्या धर्तीवर प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. महत्वाचे म्हणजे सदर प्रकल्पास ‘राष्ट्रीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरणा’कडून ना हरकतही मिळाल्याचे वृत्त आहे. त्यासंबंधी पत्रकारांनी मंत्री खंवटे यांना विचारले असता, त्यांनी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली. खरे तर या प्रकल्पाबद्दल आपणास वृत्तपत्रातील बातम्या वाचल्यानंतरच माहिती मिळाली आहे.
त्या प्रकल्पास ना हरकत दिली असेल तरीही त्याविषयी आपणास कुणीही विश्वासात घेतलेले नाही. त्याही पुढे जाताना आपण स्थानिक पंचायतीत विचारपूस केली असता त्यांनीही कोणतीही मंजुरी, ना हरकत दिलेली नाही, असे खंवटे यांनी सांगितले. अशावेळी सदर खाजगी कंपनीने समजा केंद्राकडून मंजुरी मिळविलीही असेल तर, कोणताही अभ्यास न करता या प्रकल्प प्रवर्तकास मंजुरीसाठी अर्ज करण्याची मंजुरी कुणी दिली? असा प्रश्न निर्माण होतो, असे खंवटे म्हणाले. अशा कोणत्याही प्रकल्पास मंजुरी देण्यापूर्वी स्थानिकांच्या आणि खास करून पारंपरिक मच्छिमार यांच्या भावनांची कदर होणे आवश्यक आहे. त्याशिवाय महत्वाचे म्हणजे प्रत्यक्षात प्रकल्प काय असेल व त्याचे स्वऊप कसे असेल यासंबंधी आधी त्यांनी स्थानिक पंचायत, स्थानिक आमदार यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. या सर्वांना विश्वासात घेतल्यानंतरच त्यांनी पुढील कृती, कार्यवाही करणे अगत्याचे आहे. असे ते म्हणाले.
पेन्ह द फ्रान्स पंचायतीचाही विरोध
स्थानिक पेन्ह द फ्रान्स ही पंचायतही विरोधात उभी ठाकली असून सरपंच स्वप्नील चोडणकर यांनी पत्रकार परिषदेतून ठाम विरोध दर्शविला आहे. यावेळी त्यांचे सहकारी पंच सदस्य तसेच जैव विविधता संस्थेचे अध्यक्ष, स्थानिक नागरिक मंचचे अध्यक्ष, आदींची उपस्थिती होती. स्थानिक पंचायत या नात्याने सदर कंपनीने सर्वप्रथम आम्हाला कळविणे आवश्यक होते. परंतु अद्याप तसे काही झालेले नाही. या जेटीमुळे स्थानिक मच्छिमारांच्या उपजीविकेवर संकट येणार आहे, असे सांगताना सरपंच चोडणकर यांनी या प्रकल्पास आमचा जोरदार विरोध असेल, असे स्पष्ट केले.