झारापला अनधिकृत वाळू साठा जप्त
कुडाळ महसूल पथकाची कारवाई ; 210 ब्रास वाळूचा साठा
कुडाळ -
तालुक्यातील झाराप - मुस्लिमवाडी येथे छापा टाकून बिगर परवाना अनधिकृत 210 ब्रास वाळू साठा महसूल विभागाच्या पथकाने जप्त केला. ही कारवाई कुडाळचे निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी रात्री करण्यात आली. याबाबत चौकशी सूरू असून सदर वाळू इर्शाद मुजावर ( झाराप- मुस्लिमवाडी) याची असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, सध्या अधिकृत वाळू उत्खनन बंद आहे. काही भागात पूर्वीचे अनधिकृत वाळू साठे असण्याची शक्यता आहे.या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. झाराप - मुस्लिम वाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा असल्याची तक्रार कुडाळ महसूल विभागाकडे प्राप्त झाली. त्यानुसार काल सायंकाळी उशिरा कुडाचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार श्री जाधव पथकासह त्या परिसरात दाखल झाले. श्री जाधव यांच्यासोबत मंडळ अधिकारी श्रीमती जांभवडेकर ,तलाठी निलेश कांबळे , झाराप पोलीस पाटील श्रीमती हरमलकर ,हुमरस पोलीस पाटील हेमंत वारंग,झाराप कोतवाल पौर्णिमा कुडाळकर आदी पथकात सहभागी झाले होते . झाराप - मुस्लिमवाडी परिसरात वाळूचा साठा असल्याचा शोध घेत असताना तेथे वाळूचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनाला आले.त्याच परिसरात सहा ते सात ठिकाणी वाळूचे साठे आढळले. सदर अनधिकृत सुमारे 210 ब्रास वाळू आहे. पंचनामा करून वाळू जप्त करण्यात आली. सदर वाळू साठा इर्शाद मुजावर याचा असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. संबंधिताचा जबाब घेण्यात आला. दरम्यान, तहसीलदार श्री वसावे याच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने सदर कारवाई केली. विना परवाना अनधिकृत वाळूचा साठा झाराप मुस्लिमवाडी भागात आढळला. याप्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे निवासी नायब तहसीलदार श्री जाधव यांनी सांगितले.सध्या कर्ली खाडी पात्रातील अधिकृत वाळू उत्खनन बंद आहे.मात्र, अनधिकृत वाळू उपसा करून काही भागात वाळूचा साठा वाळू माफिया मार्फत केला जातो.छुप्या पद्धतीने केलेला हा साठा नंतर चोरट्या पद्धतीने विकला जातो.झाराप येथील या कारवाईंमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.