खासगी बसमधील प्रवाशाकडून 1 कोटीची बेहिशेबी रोकड जप्त
माजाळी चेकनाक्यावर अबकारी विभागाकडून कारवाई
काणकोण : गोव्यातून बेंगळूरला जाणाऱ्या एका खासगी बसमधील प्रवाशाकडून माजाळी चेकनाक्यावरील अबकारी कर्मचाऱ्यांनी 1 कोटी रु. इतकी बेहिशेबी रक्कम जप्त केली आहे. विशेष म्हणजे ही बस पोळे चेकनाक्यावरून सहिसलामत सुटल्यानंतर माजाळी चेकनाक्यावर पेहोचताच अबकारी कर्मचाऱ्यांनी गाडीत चढून सर्व बॅगांची तपासणी करायला सुरुवात केली असता हे एवढे मोठे घबाड त्यांच्या हाती लागले. एवढ्या मोठ्या रकमेची ही बॅग ज्या व्यक्तीकडे सापडली त्या व्यक्तीचे नाव कल्पेशकुमार असे असून तो मूळचा राजस्थान येथील असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यासोबत भामऊकुमार नावाचा त्याचा साथीदार प्रवास करत होता. या रकमेसंदर्भातील रितसर कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. रोकड कुणाच्या मालकीची आहे? ती रक्कम कुठून आली आणि कुठे नेली जात होती? यासंदर्भातील कोणतीच माहिती हे दोघे प्रवासी देऊ शकले नाहीत. अबकारी विभागाने सदर रक्कम पोलिसांच्या स्वाधीन केली असून कर्नाटकातील चित्ताकुला पोलिसांनी संशयित कल्पेशकुमार आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. चित्ताकुला पोलिस पुढील तपास करत आहेत.