वेंगुर्ला आठवडा बाजारात पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणार - कंकाळ
उमेश येरम यांनी पार्किंगच्या जागेतील वाहतुक कोंडीबाबत वेधले लक्ष
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ला नगरपरिषद मार्केटमध्ये रविवारी आठवडा बाजारात वाहने पार्कींगच्या जागेत दुकाने लावली जातात. त्यामुळे पार्किंगच्या ठिकाणी वाहने नेण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे व्यापारासाठी आलेल्या दुचाकी धारकांना रस्त्यावर वाहने पार्कींग करावी लागतात. याचा परिणाम म्हणून मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होते. याबाबत शिवसेनेचे वेंगुर्ल शहर प्रमुख उमेश येरम यांनी मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मच्छीमार्केटच्या मुख्य गेटकडून पार्कींग भागात जाण्याची व्यवस्था व पार्कींगच्या ठिकाणी दुकाने न लावण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिले.
वेंगुर्ला न .प चे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांना शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांना सादर केलेल्या निवेदनात, वेंगुर्ला शहरांमध्ये रविवारी आठवडा बाजार भरत असतो. नगरपरिषदेच्या पार्कींग जागेत त्या दिवशी दुकाने लावली जातात. नगर परिषदेच्या पार्कींग जागेत जे जाणारे रस्ते आहेत ते दुकाने लावल्यामुळे बंद असतात. त्यामुळे गाड्या घेऊन लोक पार्कींग ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे लोकांना नाईलाजास्तव रस्त्यावर गाड्या लावाव्या लागतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. पार्कींगची जागा मोकळी ठेऊन त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी एक रस्ता मोकळा ठेवावा, जेणेकरून पार्कींग व्यवस्था सुलभ होईल. असे नमुद आहे. याबाबत शिवसेनेचे वेंगुर्ल शहर प्रमुख उमेश येरम यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परीतोष कंकाळ यांचेशी चर्चा केली. या चर्चेअंती वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मच्छीमार्केटच्या मुख्य गेटकडून पार्कींग भागात जाण्याची व्यवस्था व पार्कींगच्या ठिकाणी दुकाने न लावण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिले. यावेळी उपस्थितात मार्केट मधील व्यापारी संदिप गावडे, विजय गावडे, जयेश गावडे, गजा शारबिद्रे, जीजी गावड, सुरेश गवळी, सुधीर वाडकर आदींचा समावेश होता.