उमरगा-लोहारा तालुका काँग्रेस कमिटी आढावा बैठक संपन्न
उमरगा :
उमरगा शहरात काँग्रेस भवनमध्ये धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे पक्ष निरीक्षक डॉ.जितेंद्र देहाडे, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या उपस्थितीत उमरगा लोहारा तालुका काँग्रेस आढावा बैठक तसेच जिल्हा व तालुकास्तरावर संघटन मजबूत होण्यासाठी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आश्लेष मोरे यांच्या पुढाकाराने बैठक पार पडली.
काँग्रेस पक्षाचे विचार गावागावात तळागाळापर्यंत पोहचवून आगामी काळात तालुक्यात पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन डॉ.जितेंद्र देहाडे यांनी केले.
काँग्रेसचा संघटनात्मक आढावा घेऊन आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आत्तापासून कामाला लागण्याच्या सूचना यावेळी करण्यात आली.
यावेळी उमरगा व लोहारा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पक्षात कार्यकर्त्यांना बळकटी देण्यासाठी प्रयत्न करावे. राज्य पातळीवरील पदाची नियुक्ती करताना उमरगा भागातील नेतेमंडळीचा विचार करावा. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निष्ठावंतांना संधी द्यावी आदी विषयावर साधक बाधक यावेळी चर्चा झाली.