उमा पाटीलने नादोड्यातील महिलेला चार लाखांना गंडविले
म्हापसा : सरकारी नोकरीला लावते अशी थाप मारून तब्बल 4 लाख ऊपये उकळल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी बायणा-वास्को येथील उमा पाटील हिला काल बुधवारी दि. 27 रोजी अटक केली. याप्रकरणी नादोडा येथील 44 वर्षीय महिलेने तक्रार केली आहे. सरकारी नोकरीसाठी पैसे घेण्यासंबंधीची बार्देश तालुक्यातील ही पहिलीच तक्रार आहे. ही फसवणुकीची घटना गेल्या ऑगस्ट 2023 मध्ये घडली होती. तुझ्या पतीला कुठल्यातरी सरकारी खात्यात नोकरीला लावतेच, असे संशयित उमा हिने फिर्यादीला सांगितले होते. मात्र संशयिताने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच पोलिस तक्रार दिली होती. कोलवाळ पोलिसांनी 14 नोव्हेंबरला याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता. राज्यात दर दिवशी एका मागोमाग एक अशा सरकारी नोकरीला लावते असे संगून पैसे उकळण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याचे पहायला मिळत असून आता बार्देश तालुक्यातून ही पहिली तक्रार नोंद झाली आहे. दरम्यान उमा पाटील हिला न्यायालयात हजर केले असता 5 दिवसाचा रिमांड देण्यात आला आहे.