वायर, केबल व्यवसायात अल्ट्राटेक देणार टक्कर
1800 कोटी गुंतवणार, गुजरातमध्ये स्थापणार कारखाना
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
वायर आणि केबल क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळात स्पर्धा वाढणार आहे. या स्पर्धेमध्ये आता सिमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी अल्ट्राटेक सिमेंट उतरणार असल्याची माहिती समोर येते आहे. 1800 कोटी रूपयांची गुंतवणूक नव्या व्यवसायासाठी करण्याची तयारी कंपनीने केली असल्याचे समजते. या क्षेत्रामध्ये केईआय इंडस्ट्रीज, पॉलीकॅब आणि हॅवल्स या कंपन्या आधीपासूनच कार्यरत आहेत. त्यांना या बातमीने धक्का बसला आहे.
गुरूवारी सकाळी अल्ट्राटेक सिमेंटची वायर आणि केबल व्यवसायात उतरण्याची घोषणा होताच या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग शेअरबाजारात मोठ्या प्रमाणामध्ये घसरताना पाहायला मिळाले. यामध्ये काही कंपन्यांच्या समभागांना लोअर सर्कीटही लागले होते. आदित्य बिर्ला समुहातील अल्ट्राटेक सिमेंटने सदरची नवी घोषणा करत वायर आणि केबल क्षेत्रातील स्पर्धक कंपन्यांना चांगलाच धक्का दिला आहे. या आधी ग्रासीम इंडस्ट्रीज रंग उत्पादनामध्ये उतरली होती. त्यावेळी सुद्धा रंग कंपन्यांमध्ये निराशा दिसली होती.
कारखाना स्थापणार
अल्ट्राटेक कंपनी वायर आणि केबल संबंधीत व्यवसाय सुरू करण्यासाठी गुजरातमधील भरूच येथे कारखाना स्थापन करणार आहे. 1800 कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार असून पुढील दोन वर्षामध्ये याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. डिसेंबर 2026 पासून कारखाना प्रत्यक्षात कार्यरत होईल, असेही म्हटले जात आहे.
समभागांवर दबाव
अल्ट्राटेकच्या प्रवेशानंतर वायर आणि केबल क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याची दिसून आली. शेअर बाजारात केईआय इंडस्ट्रीज पॉलीकॅब इंडिया, हॅवल्स इंडिया आणि आरआर केबल्स यांचे समभाग विक्रीच्या दबावामुळे 17 टक्क्यापर्यंत खाली आले होते. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे समभाग सुद्धा 6 टक्क्यापर्यंत बाजारात घसरले होते.