अल्ट्राटेक सिमेंटने पहिल्यांदा प्राप्त केले 3 लाख कोटींचे बाजारमूल्य
देशातील सर्वात मोठी 20 वी कंपनी बनली : समभागही 10,470 च्या उच्चांकी पातळीवर
वृत्तसंस्था /मुंबई
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटने बुधवारी (डिसेंबर 27) पहिल्यांदाच 3 लाख कोटींच्या बाजारमूल्याचा टप्पा ओलांडला आहे. यासह अल्ट्राटेक सिमेंट भारतातील 20 वी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. कंपनीचे समभाग देखील 10,470 च्या उच्चांकी पातळीवर कार्यरत आहेत. अल्ट्राटेक सिमेंटचा समभाग गुरुवारी 4.50 टक्के वाढीसह 10,469.95 रुपयांवर बंद झाला. निफ्टी-50 च्या टॉप गेनर्समध्येही त्याचा समावेश झाला आहे. अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्सनेही व्यवहारादरम्यान 10,470 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक आणि 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. यासह, कंपनीचे बाजार भांडवलही 3.01 लाख कोटी रुपये झाले आहे. अल्ट्राटेक सिमेंट व्यतिरिक्त सर्व सिमेंट समभागात गुरुवारी जोरदार तेजी दिसून आली. ब्रोकरेज फर्म नोमुराला सिमेंट स्टॉकमध्ये मजबूत वाढीची अपेक्षा आहे आणि त्यांनी लक्ष्य किंमतदेखील वाढवली आहे. त्यामुळेच गुरुवारी अनेक सिमेंटच्या कंपन्यांचे समभाग वधारले होते. ब्रोकरेज हाऊसने अल्ट्राटेक सिमेंटचे रेटिंग ‘न्यूट्रल’ वरून ‘बाय’ केले आहे. या फर्मने स्टॉकसाठी 11,500 रुपयांची लक्ष्य किंमतदेखील दिली आहे. भारताच्या सिमेंट उद्योगाने एच1 आर्थिक वर्ष 24 मध्ये वार्षिक 17 टक्क्यांची मजबूत वाढ नोंदवली आहे. उत्तरार्धात ही गती कायम राहण्याची अपेक्षा आहे, असे नोमुराने सांगितले. या कालावधीत, पहिल्या सहामाहीत विक्रीचे प्रमाण 11 टक्के आणि वार्षिक 13 टक्के वाढण्याची अपेक्षा आहे.
अल्ट्राटेकचा महिन्यात 20 टक्के परतावा
गेल्या एका महिन्यात अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये सुमारे 20 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, या कंपनीच्या समभागाने गेल्या 6 महिन्यांत 26 टक्के परतावा दिला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 49 टक्के वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांत, कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 104 टक्के परतावा दिला आहे.