अब्दुल्ला सरकारला 25 आमदारांचा अल्टिमेटम
14 दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास पाठिंबा काढण्याचा इशारा
वृत्तसंस्था, श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर राजकीय संकट निर्माण होण्याची शक्मयता आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांनी पक्ष नेतृत्वाला 14 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत मागण्या मान्य न झाल्यास सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा आमदारांनी दिला आहे. मंत्रिपद न मिळाल्याने हे आमदार नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
नाराज आमदारांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे सल्लागार नासिर सोगामी यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. तसेच 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात नियुक्त करण्यात आलेल्या चार नव्या मंत्र्यांना हटवून मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. नासिर सोगामी यांच्यावर पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करणे आणि पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात हस्तक्षेप करण्याचे आरोप आमदारांनी केले आहेत.
चार सदस्यीय शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
नाराज आमदारांच्या बैठकीत चार सदस्यीय शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ नेते आणि गुरेझचे आमदार नजीर अहमद गुरेझी तसेच थानामंडीचे आमदार मुजफ्फर इक्बाल खान या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत.
हे शिष्टमंडळ पक्षाध्यक्ष फाऊख अब्दुल्ला आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करणार आहे. नेतृत्वाच्या उत्तरानंतर पुढील रणनीती ठरवण्याचा निर्णय आमदारांनी घेतला आहे.
श्रीनगरच्या खासदाराचाही राजीनाम्याचा इशारा
दरम्यान, श्रीनगरचे खासदार आगा सैयद रूहुल्लाह मेहदी यांनीही पक्ष आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. 3 नोव्हेंबर रोजी दोन्ही पदांचा औपचारिक राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष नेतृत्व वैचारिक बांधिलकीपासून दूर जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कलम 370 बाबत केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्याच्या आश्वासनापासून पक्ष मागे हटत असल्याचेही मेहदी यांनी म्हटले आहे.
मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी
27 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळ विस्तारात नॅशनल कॉन्फरन्सचे अली मोहम्मद सागर, मीर सैफुल्लाह, शमीमा फिरदौस आणि अल्ताफ अहमद कल्लू यांना मंत्रिपदे देण्यात आली. अपक्ष आमदार सतीश शर्मा यांना मात्र मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. या विस्तारात अनेक ज्येष्ठ आमदारांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामध्ये नजीर अहमद गुरेझी आणि मुबारक गुल यांचाही समावेश आहे. मुबारक गुल यांची नंतर पक्षाचे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता नाराज आमदारांच्या मागण्यांवर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेते, याकडे जम्मू-काश्मीरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.