उल्हासनगरमध्ये प्रसिद्ध युट्यूबर हरेश गजवानी यांची निर्घृण हत्या
रेल्वे स्टेशन परिसरात थरार
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास युट्यूबर हरेश गजवानी हे उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावरून जात होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना गाठून हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात जवळून दोन गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. या गोळीबारात गजवानी गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
गोळीबारानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्यानेही वार केल्याची माहिती आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात पळापळ झाली. या हल्ल्यात हरेश गजवानी यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली.
तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विठ्ठलवाडी पोलिसांनी तपासासाठी तीन पथके तयार केली. त्याचवेळी ठाणे गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अविनाश नायडू, विजय पुरणसिंग आणि नूर आलम खान या तिघांना ताब्यात घेतले.
या तिघांचा हत्येतील सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण काय, आरोपींनी हा हल्ला कोणत्या हेतूने केला आणि या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे.
हत्येमागील कारणांचा शोध सुरू
उल्हासनगरसारख्या वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या हत्येमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पोलिसांकडून संशयितांची चौकशी करून हल्ल्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. तपासातून पुढे येणाऱ्या माहितीनंतर या प्रकरणातील अधिक तपशील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
