हिजबुल मुजाहिद्दीनच्या उल्फत हुसेनला अटक
18 वर्षांपासून फरार दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या : उत्तर प्रदेश एटीएसची मोठी कारवाई
वृत्तसंस्था / लखनौ, मुरादाबाद
उत्तर प्रदेश एटीएसने एका मोठ्या कारवाईत हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी उल्फत हुसेन याला काश्मीरमधून अटक केली आहे. एटीएस आणि उत्तर प्रदेश पोलीस गेल्या 18 वर्षांपासून उल्फतच्या मागावर होते. पोलिसांनी त्याच्यावर 25,000 रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. वैद्यकीय तपासणीनंतर उल्फतला मुरादाबाद कारागृहात पाठवण्यात आले आहे. सध्या झालेली अटक राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने खूप मोठी मानली जात आहे. तज्ञांच्या मते, पुढील तपासात अनेक महत्त्वाची माहिती मिळू शकते.
उत्तर प्रदेश एटीएसने कटघर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करत उल्फत हुसेन या दहशतवाद्याला अटक केली. दहशतवाद्याला अटक केल्यानंतर एटीएसने त्याच्या ओळखीबाबत माहिती दिली. दहशतवाद्याचे नाव उल्फत हुसेन उर्फ मोहम्मद सैफुल्ला उर्फ अफजल उर्फ हुसेन मलिक असल्याचे सांगण्यात आले. हा दहशतवादी मूळचा काश्मीरचा आहे. तो काश्मीरमधील पूंछ जिह्यातील रहिवासी आहे. तो 2007 पासून जामिनावर सुटल्यानंतर फरार झाला होता.
उल्फत हुसेन हा लहान वयातच हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला. त्याने पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवादी छावणीत आपले प्रशिक्षण पूर्ण केले. एटीएसच्या म्हणण्यानुसार तो येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट रचत होता.
सुरुवातीला उल्फत हुसेनला 9 जुलै 2001 रोजी पकडण्यात आले होते. त्यावेळी त्याच्याकडून 9 किलो स्फोटके, रायफल्स, बंदुका, 507 जिवंत काडतुसे, 2 पिस्तूल, 12 हातबॉम्ब आणि 50 डिटोनेटर अशी मोठी आणि धोकादायक शस्त्रs जप्त करण्यात आली होती.