क्रीमियावर युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला
रशिया सैन्याने नष्ट केले 660 ड्रोन : संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता
त् वृत्तसंस्था, कीव्ह
4 वर्षांपेक्षा अधिक काळापासून जारी रशिया आणि युक्रेन युद्ध थांबण्याची कुठलीच चिन्हे नाहीत. फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झालेला दोन्ही देशांचा संघर्ष आतापर्यंत जारी आहे. नव्या घटनाक्रमात युक्रेनकडून भीषण हल्ला करण्यात आला असून हा आतापर्यंतच्या लढाईत सर्वात मोठा हल्ल्यांपैकी एक असल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला आहे. युक्रेनने रशियाच्या कब्जात असलेल्या क्रीमियाला या हल्ल्याद्वारे लक्ष्य केले असल्याचे समजते.
रशियाच्या वायुदलाने युक्रेनच्या 660 ड्रोन्सना आकाशातच नष्ट केल्याचा दावा केला आहे. युक्रेनने हा हल्ला रशियाच्या 12 वेगवेगळ्या भागांसोबत क्रीमिया, काळा समुद्र आणि अजोव समुद्रात केला आहे. या ड्रोन हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष वाढण्याची मोठी शक्यता आहे. युक्रेन मागील काही काळापासून रशियाच्या तेल उत्पादन आणि ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करत आहे. या रणनीतिमुळे रशियाचा इंधन पुरवठा आणि सैन्य रसद घटली असल्याचे जाणकारांचे मानणे आहे. तसेच युद्धभूमीवर रशियाचे प्रयत्न मंदावले असून राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यावरील दबाव वाढला आहे.
तर युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी ‘40 दिवसांच्या प्रभाव अभियाना“चा आदेश दिल्याच्या काही तासांनी हा मोठा हल्ला झाला आहे. याचा उद्देश हल्ल्यांना तीव्र करत रशियाला युद्ध समाप्त करण्यासाठी भाग पाडणे असल्याचे मानले जात आहे. मागील एक वर्षापासून अमेरिकेच्या शांतता प्रयत्नांचा कुठलाच ठोस परिणाम निघाला नसताना युक्रेनने हे पाऊल उचलले आहे.
हल्ल्यांमुळे नुकसान
युक्रेनच्या हल्ल्यात मॉस्कोच्या तुला क्षेत्रातील घरांचे नुकसान होत काही जण जखमी झाले आहेत. तसेच तुला शहरातील वीजवाहिन्या आणि औद्योगिक केंद्राचे नुकसान झाले आहे. तर एक रासायनिक प्रकल्प आणि हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पाला आग लागली असल्याचे समजते. मॉस्कोच्या दिशेने येणाऱ्या 47 ड्रोन्सचा नष्ट करण्यात आल्याचा दावा महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी केला आहे.
रशियाकडूनही प्रतिहल्ला
रशियाने देखील युक्रेनच्या खारकीव्ह क्षेत्रावर हल्ले केले. खारकीव्हमध्ये मागील 24 तासांमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यांमध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. रशियाने खारकीव्ह आणि आसपासच्या 16 भागांवर गायडेड बॉम्ब आणि ड्रोन्सद्वारे हल्ले केले. रशियाच्या 189 ड्रोन्सपैकी 174 ड्रोन्सना आकाशातच नष्ट करण्यात आले, तर 7 पैकी 4 इस्कंदर-एम बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs लक्ष्याव्