युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोनहल्ला
राजधानी मॉस्कोवर 38 ड्रोन डागली : नष्ट करण्यात रशिया यशस्वी
वृत्तसंस्था/ मॉस्को
युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोच्या दिशेने जवळपास 38 रॉकेट डागल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या हल्ल्यानंतर रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये गोंधळ उडाला. मॉस्कोसह नजिकच्या तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील उड्डाणे अन्यत्र वळविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मॉस्कोच्या आग्नेयेकडील भागात ड्रोनने गोळीबार केल्याने एका 50 वषीय महिलेचा चेहरा, मान आणि हात भाजल्याचे स्थानिक गव्हर्नर आंद्रेई व्होरोब्योव्ह यांनी सांगितले. मात्र, मॉस्कोमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. युक्रेनने रशियावर केलेला 2022 नंतरचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचा दावा केला जात आहे.
युक्रेनने शनिवारी मध्यरात्रीनंतर मॉस्को आणि त्याच्या उपनगरांमध्ये ड्रोन हल्ला चढवला. हा हल्ला रोखण्यात रशियन यंत्रणांना बऱ्यापैकी यश आले असले तरी एक महिला जखमी झाली. मात्र, रशियाच्या काही व्यस्त विमानतळांवरील वाहतूक तात्पुरती थांबवावी लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रशियाच्या राजधानीच्या बाहेरील भागात एकूण 32 ड्रोन पाडण्यात आले. तसेच शेरेमेत्येवो आणि डोमोडेडोवोसह प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणे काही वेळासाठी थांबवण्यात आल्याचे रशियाच्या विमान वाहतूक प्राधिकरणाने सांगितले.