युक्रेनचा रशियावर 9/11 स्टाईल हल्ला
38 मजली इमारतीला ड्रोनची धडक : प्रत्युत्तरादाखल रशियाने युव्रेनच्या 12 शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे
वृत्तसंस्था/ कीव, मॉस्को
रशियाच्या सेराटोव्हमध्ये सोमवार, 26 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या वर्ल्ड टेड सेंटरसारखा हल्ला झाला. ‘व्होल्गा स्काय’ या 38 मजली निवासी इमारतीला सकाळी ड्रोनने धडक दिली. यामध्ये 4 जण जखमी झाले. युव्रेनने रशियाच्या रोस्तोव, सेराटोव्ह, कुर्स्क आणि बेल्गोरोड भागांना लक्ष्य करून मोठा हल्ला केला. या हल्ल्यासाठी रशियाने युव्रेनला जबाबदार धरले आहे. प्रत्युत्तरादाखल रशियाने युव्रेनच्या कीव, खार्किव, लिव्ह आणि ओडेसासह 12 शहरांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागली. राजधानी कीवमध्ये किमान सात स्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
युक्रेनने सोमवारी रशियावर 20 ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. यापैकी सर्वाधिक 9 सेराटोव्हमध्ये डागण्यात आली. मॉस्कोच्या गव्हर्नरनी युव्रेनवर हल्ल्याचा आरोप केला आहे. यावर युव्रेनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. युव्रेनच्या लष्कराने सेराटोव्ह प्रांतातील एंगेल्स येथील सर्वात उंच इमारतीला लक्ष्य केले. एंगेल्समध्ये रशियाचा स्ट्रॅटेजिक बॉम्बर लष्करी तळही आहे. रशिया-युव्रेन युद्ध सुरू झाल्यापासून युव्रेनने अनेकवेळा त्यावर हल्ले केले आहेत. आता युव्रेनने नव्याने केलेल्या हल्ल्यात रशियन इमारतीचा काही भाग कोसळला आहे. तसेच इमारतीखाली उभ्या असलेल्या 20 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले. यात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सेराटोव्ह हे शहर युव्रेन सीमेपासून 900 किमी अंतरावर आहे. या हल्ल्यानंतर सर्व प्रकारच्या हवाई मार्गांवर बंदी घालण्यात आली आहे. रशियन संरक्षण दलांनी रोस्तोव परिसरात किमान 44 ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. ज्या हवाई तळावर हल्ला करण्यात आला तो रोस्तोव येथे आहे. रशियाने या घटनेचा अधिक तपशील जाहीर केलेला नाही.
रशियाचेही चोख प्रत्युत्तर
युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियानेही युक्रेनला चोख प्रत्युत्तर देत अनेक ठिकाणी हल्ले चढवले. रशियाने युव्रेनवर मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला आहे. कीववरील हल्ला 11 टीयु-95 स्ट्रॅटेजिक बॉम्बर आणि किन्झाल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी करण्यात आल्याचे युव्रेनच्या हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रतिहल्ल्यांमध्ये एका निवासी इमारतीचे नुकसान झाल्याची नोंद आहे. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे. रशियाचा हल्ला युव्रेन-पोलंड सीमेजवळ झाला. या हल्ल्यानंतर पोलिश आणि नाटोच्या विमानांना सतर्कतेवर ठेवण्यात आल्याचे पोलिश लष्करी अधिकाऱ्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
20 दिवसांपासून रशियावर हल्ले तीव्र
अडीच वर्षांच्या रशिया-युव्रेन युद्धात 6 ऑगस्ट 2024 रोजी पहिल्यांदाच युव्रेनने रशियात घुसून कुर्स्क क्षेत्रापर्यंत धडक मारल्यानंतर युव्रेन सातत्याने रशियावर हल्ले करत आहे. गेल्या 20 दिवसांत युव्रेनच्या हल्ल्यात 31 रशियन नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. त्याचवेळी, 140 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच रशियन भूमी परकीय सत्तेने काबीज केली आहे. युव्रेनने दोन आठवड्यात रशियाचे 1263 चौरस किलोमीटर क्षेत्र ताब्यात घेतल्याचे समजते.
23 वर्षांपूर्वी वर्ल्ड टेड सेंटरवर हल्ला
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक ड्रोन ‘व्होल्गा स्काय’ इमारतीच्या दिशेने वेगाने जात असून त्याला आदळल्याचे दिसत आहे. 11 सप्टेंबर 2001 रोजी दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या वर्ल्ड टेड सेंटरवर अशाप्रकारे विमाने धडकवली होती. दहशतवाद्यांनी 4 विमानांचे अपहरण केले होते. यापैकी 3 विमाने अमेरिकेतील 3 महत्त्वाच्या इमारतींवर एकामागून एक धडकवली. 9/11 च्या हल्ल्यात 93 देशांतील 3 हजार लोक मारले गेले. मानवी इतिहासातील हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला मानला जातो.