For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युक्रेन युद्ध आणखी लांबण्याची चिन्हे

09:42 PM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
युक्रेन युद्ध आणखी लांबण्याची चिन्हे
Advertisement

24 फेब्रुवारी 2022 साली सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धास गेल्या शनिवारी 2 वर्षे झाली. या युद्धाने हा जो काळाचा टप्पा गाठला आहे त्याचे दु:खद परिणाम युद्धग्रस्त व आसपासच्या प्रदेशातील भावी पिढ्यांना जाणवण्यासारखे ठरणार आहेत. युनोच्या ताज्या आकडेवारीनुसार हे युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनमध्ये 5017 पुरुष, 3093 महिला आणि 587 मुले असे 10,582 नागरिकांचे बळी गेले आहेत. तर जखमींची संख्या 19,875 इतकी आहे.

Advertisement

युद्धात 65 लाख युक्रेनी नागरिकांनी निर्वासित स्वरुपात जगातील अनेक देशात आसरा घेतला आहे तर 37 लाख नागरिक युक्रेनमध्ये विस्थापित झाले आहेत. युद्धावर तोडगा काढण्यासाठी वाटाघाटी, मध्यस्थी असे सारे प्रयत्न झाले. परंतु युद्धातील दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याने युद्ध थांबविण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. युक्रेनची भूमिका ही आहे की रशियाने युक्रेनवरील आपला हक्क सोडावा, आपले सारे सैन्य मागे घ्यावे आणि आतापर्यंत जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई करावी. रशियाचे म्हणणे असे आहे की, युक्रेनने तटस्थ, नि:पक्षपाती भूमिका घ्यावी जी आधी होती. अणू विरहीत स्थितीत यावे आणि रशियन भाषेत बोलणाऱ्या नागरिकांना हक्क व स्वातंत्र्य द्यावे, यासाठी विनाअट चर्चेस सामोरे यावे.

Advertisement

जेव्हा रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी दोन वर्षांपूर्वी या युद्धास सुरुवात केली तेव्हा त्यांना वाटले होते की, आपले लष्करी सामर्थ्य आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या जोरावर आपण काही दिवसातच युक्रेनला पराभूत करू, तथापि, कमी सैन्य आणि शस्त्रे असूनही पाश्चात्य देशांच्या शस्त्रे व इतर सामुग्री पुरवण्याच्या जोरावर युक्रेनने चिवट झुंज सुरू ठेवली आहे. त्यातच रशियाच्या प्रत्यक्ष युद्ध भूमीवरील घोडचुका व चुकीच्या व्यूहरचनेमुळे लवकर विजय मिळविण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. असे असले तरी सद्यस्थितीत युद्धाचे पारडे बऱ्याच प्रमाणात रशियाकडे झुकले आहे. युक्रेनला सातत्याने शस्त्र पुरवठा करणारे पाश्चात्य देश त्यावरील खर्चामुळे मेटाकुटीस आले आहेत. परिणामी, युक्रेनला आता आवश्यक शस्त्रांचा अभाव जाणवू लागला आहे. त्याचप्रमाणे मनुष्यबळाच्या तुटवड्यामुळेही युक्रेन अडचणीत आला आहे. दुसरीकडे रशियाने आधीच्या युद्धांची दुरुस्ती करीत परिस्थितीशी जुळवून घेत आपल्या रणनीतीत नवे बदल करून युद्ध सुरू ठेवले आहे. महत्त्वाचे म्हणजे युद्धजन्य स्थितीत निर्बंध व इतर कारणांमुळे कोसळणारी आपली अर्थव्यवस्था रशियाने सावरली आहे. त्यातच हमास-इस्त्रायल युद्ध सुरू झाल्याने पाश्चात्य देशांनी आपली आर्थिक व लष्करी मदत इस्त्रायलकडे वळविणे रशियाच्या पथ्यावर पडले आहे.

एकंदरीत पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की या दोघांचेही मनसुबे युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करण्याकडे नाहीत. कारण युद्धातून जे निष्पन्न होईल त्यावर त्यांचे राजकीय व वैयक्तिक अस्तित्व अवलंबून आहे. पुतिन यांनी युद्ध सुरू केल्यानंतर रशियास प्रचंड हानीस सामोरे जावे लागले आहे. मोठ्या प्रमाणात सैनिक मृत वा जखमी झाले आहेत. विशेषत: सैन्यातील तरुण पिढी गमावणे अधिक चिंताजनक आहे. पुढील महिन्यात रशियात निवडणुका होतील. त्या आधीच पुतिन यांनी प्रमुख विरोधक अलेक्सी नवलनी यांचा काटा काढला आहे. इतर युद्धविरोधी नेत्यांना नेस्तनाबूत केले आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे पुतिन ही निवडणूक जिंकून राष्ट्राध्यक्षपदावर राहतील. त्यांनी जर त्या आधी युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तर सदर युद्धात झालेले मानवाधिकाराचे उल्लंघन त्यांना निश्चित गोत्यात आणू शकते. त्याचप्रमाणे युद्धानंतर इतकी हानी सोसून काय मिळाले? असा सवाल जनतेतून उठून मोठ्या प्रमाणातील जनप्रक्षोभास त्यांना सामोरे जावे लागेल. याचाच अर्थ हे सारे टाळण्यासाठी युद्ध लांबविणे त्यांच्यासाठी अपरिहार्य बनले आहे. ते आणखी काही काळ सुरू राहण्याची शक्यता यामुळे बळावली आहे. पुतिन यांच्या युद्ध सुरूच ठेवण्याच्या इच्छेमागे आणखी एक कारण दडले आहे. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत निवडणुका आहेत. त्यात पुतिन यांचे आतून सहानुभूतीदार आणि युक्रेनला लष्करी मदत करण्याच्या विरोधात असलेले माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडून येतील, असा पुतिन यांचा होरा आहे.

युद्धात युक्रेनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे भवितव्यच पणास लागल्यामुळे संपूर्ण विजय हाच मार्ग त्यांच्याकरीता उरला आहे. अमेरिकन संसदेने 95 अब्ज डॉलर्सची लष्करी मदत युक्रेन, इस्त्रायल व तैवानसाठी जाहीर केली आहे. परंतु प्रतिनिधी सभागृहात ती मंजूर होणे राजकीय मतभेदांमुळे कठीण बनले आहे. कमी शस्त्र पुरवठ्यामुळे दोनेक प्रदेशातील काही भागातून संन्यास माघार घ्यावी लागली आहे. जर अमेरिकेने युक्रेनला वेळीच शस्त्रs पुरवली नाहीत तर रशियाचे आक्रमण अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यानंतर जरी युक्रेनने शांततेसाठी तह करण्याची तयारी दर्शविली तरी ती शरणागतीच ठरणार आहे. सध्या सर्वेक्षणातून झेलेन्स्की यांची लोकप्रियता काही प्रमाणात घटली आहे. परंतु अद्याप 70 टक्के युक्रेनी नागरिकांचा त्यांना पाठिंबा आहे. जोपर्यंत ‘मार्शल लॉ’ देशात जारी आहे. तोपर्यंत त्यांनी सत्तेवर राहावे. प्राप्त परिस्थितीत येणाऱ्या निवडणुका पुढे ढकलाव्यात असे जनतेचे मत दिसतं. युद्धकालीन अडचणींमुळे जर रशियाशी शस्त्रसंधी करण्याचा प्रयत्न केला तर तो देखील पुतिन स्वत:स अनुकूल असा करतील हे झेलेन्स्की यांना पक्के ठाऊक आहे. त्यांनी वेळोवेळी असेही म्हटले आहे की, ‘रशियाने आपल्या ताब्यात घेतलेला जो प्रदेश आहे तो युक्रेनला परत करण्याच्या पूर्व अटीवरच बोलणी होऊ शकतील’, झेलेन्स्की यांना या युद्धाच्या निरंतरतेची निकडही प्रकर्षाने जाणवत आहे. युद्धात जर युक्रेनकडून कुठे खंड पडला तर रशियास नव्याने शस्त्रसज्ज होण्यास वेळ मिळेल याची जाणीव त्यांना आहे.

या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी युक्रेन लष्करात वरिष्ठ स्तरावर काही फेरबदल केले आहेत. जुन्या अधिकाऱ्यांना बदलून त्यांनी त्या जागी तरुणांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे रणांगणावरील हालचालीत गतीशीलता आणि नव्या डावपेचांना वाव मिळेल, असे त्यांना वाटते. झेलेन्स्कीना अमेरिकेची शस्त्रास्त्रे केव्हा मिळतील याची निश्चिंती नसल्याने शत्रास्त्र उत्पादनात त्यांनी वाढ केली. नाटोच्या मदतीने,  सरकारमधील विविध तज्ञांसोबत घेऊन व्यापक युद्धाची तयारी झेलेन्स्कीनी केलीय. पुरवठा आणि संपर्क यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर त्यांचा भर आहे. गेल्या शनिवारी त्यांनी ‘कीव’ या राजधानी शेजारील विमानतळास भेट दिली.  यावेळी उपस्थितांना संबोधित करताना झेलेन्स्की म्हणाले, ‘कोणत्याही सामान्य माणसास हे युद्ध संपावे असे वाटले. पण आमच्यापैकी कोणासही देश संपावा असे कदापि वाटणार नाही. युद्ध संपायचे असेल तर ते आमच्या शर्तीवर व आमचे स्वातंत्र्य अबाधित राखूनच संपेल. म्हणूनच लढा आणि विजयी व्हा.’ एकंदरीत झेलेन्स्की आणि पुतिन यांना जिंकूनच युद्धाची अखेर व्हावी, असे वाटत असल्याने हे युद्ध आणखी किती काळ चालेल हे सांगता येणे कठीण आहे.

-अनिल आजगावकर

Advertisement
Tags :

.