युक्रेन युद्धामुळे रशियाच्या तिजोरीवर ताण
नागरिकांवर वाढणार करांचा बोजा : पुतीन शोधत आहेत नवे मार्ग
वृत्तसंस्था/मॉस्को
युक्रेनविऊद्ध सुरू असलेल्या युद्धाचा वाढता खर्च आणि लष्करी खर्चामुळे रशियाच्या सरकारी तिजोरीवर दबाव वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे सरकार महसूल वाढवण्यासाठी करांचे नवे पर्याय शोधत आहे. खाण कंपन्या, गुंतवणूकदार आणि काही उत्पन्न गटांवर अतिरिक्त कर लावण्याचे प्रस्ताव पुढे आले आहेत. कीव स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टपर्यंत रशियाची अर्थसंकल्पीय तूट 5.8 ट्रिलियन रूबल म्हणजेच सुमारे 72 अब्ज डॉलरवर पोहोचली. ही तूट मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत जवळपास 50 टक्क्मयांनी अधिक आहे. वाढता लष्करी खर्च, आर्थिक विकासाचा मंदावलेला वेग आणि आंतरराष्ट्रीय निर्बंध यांमुळे अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढला आहे.
कोणत्या करांमध्ये वाढ होणार?
सरकारच्या प्रस्तावानुसार, लोहखनिज, निकेल आणि सोन्याचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर अतिरिक्त नफ्यासाठी 20 ते 30 टक्क्यांपर्यंत कर लावण्याचा विचार आहे. व्याज, लाभांश आणि मालमत्ता विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरही 13 ते 22 टक्क्मयांपर्यंत कर आकारण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय, परदेशातून ऑनलाइन मागवण्यात येणाऱ्या 200 युरोपेक्षा कमी किमतीच्या वस्तूंवर 22 टक्के व्हॅट आणि प्रत्येक पार्सलवर 100 रूबल शुल्क लावण्याची योजना आहे. काही विदेशी गुंतवणूकदारांच्या लाभांशावर 35 टक्के कर लावण्याचाही प्रस्ताव आहे.
युद्धखर्चामुळे विकासकामांवर परिणाम?
आर्थिक तज्ञांच्या मते, रशियाकडे आगामी काळातील तूट भरून काढण्यासाठी काही आर्थिक पर्याय आहेत. मात्र, वाढते कर आणि उद्योगांचा खर्च यामुळे सामान्य नागरिकांवरही आर्थिक भार पडू शकतो. लष्करी खर्चाला प्राधान्य दिल्याने पायाभूत सुविधा आणि इतर विकासकामांसाठी उपलब्ध निधी कमी होण्याची शक्मयता आहे. रशियाचा राष्ट्रीय संपत्ती निधी हा महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असला, तरी त्यातील सहज वापरता येणाऱ्या मालमत्तांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जागतिक तेलाच्या किमती घसरल्यास किंवा आर्थिक व्यवस्थेवरील विश्वास कमी झाल्यास रशियासमोरील आर्थिक आव्हाने अधिक गंभीर होऊ शकतात. एकूणच, युद्धाचा खर्च भागवण्यासाठी रशिया कर महसूल वाढवण्याच्या मार्गावर आहे. मात्र, या धोरणाचा परिणाम उद्योग, गुंतवणूकदार आणि सामान्य नागरिकांच्या आर्थिक स्थितीवर होण्याची शक्मयता आहे.
