शांतता योजना स्वीकारण्यास युक्रेन तयार
अमेरिका-रशियादरम्यान प्रयत्नांना वेग : तोडग्यासमीप पोहोचल्याचा ट्रम्प यांचा दावा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
मागील सुमारे 4 वर्षांपासून जारी युक्रेन युद्धाच्या तोडग्यावरून अमेरिका आणि रशियादरम्यान प्रयत्नांना वेग आला आहे. यानुसार अबू धाबी येथे दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांदरम्यान चर्चा झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या नव्या पुढाकाराच्या अंतर्गत ही चर्चा पार पडली असून यात युक्रेन युद्ध समाप्त करविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याचदरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी शांतता कराराच्या दिशेने वाटचाल करण्यास युक्रेन तयार असल्याचे वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी याप्रकरणी अत्यंत कठोर भूमिका घेतल्याने युक्रेनच्या अध्यक्षांना नरमाईचे धोरण स्वीकारावे लागले आहे. संवेदनशील मुद्द्यांवर ट्रम्प यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच या चर्चेत युरोपीय सहकारीही सामील असावेत असे झेलेंस्की यांनी म्हटले आहे. तर युक्रेनप्रकरणी आम्ही तोडग्याच्या अत्यंत नजीक पोहोचलो असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
अमेरिका-रशियादरम्यान चर्चा
अमेरिकेचे आर्मी सेक्रेटरी डॅन ड्रिस्काल यांनी रशियन अधिकाऱ्यांसोबत यासंबंध्घ चर्चा केली आहे. सोमवारी रात्री आणि मंगळवारी सेक्रेटरी ड्रिस्काल आणि त्यांच्या टीमने अबू धाबीमध्ये रशियन प्रतिनिधिमंडळासोबत युक्रेनमध्ये स्थायी शांतता प्राप्त करण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली. ही चर्चा अत्यंत चांगली राहिली असून आम्ही आशावादी आहोत, असे ड्रिस्काल यांचे प्रवक्ते लेफ्टनंटर कर्नल जेफ टोल्बर्ट यांनी सांगितले आहे. प्रत्यक्षात काय चर्चा झाली आणि रशियन प्रतिनिधिमंडळात कोण सामील होते हे स्पष्ट नाही. ड्रिस्काल हे अबू धाबीमध्ये युक्रेनच्या अधिकाऱ्यांनाही भेटू शकतात.
शांतता योजनेचा मसुदा
अमेरिकेने युद्ध संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने युक्रेनला 28 सूत्री शांतता योजनेचा मसुदा दिला आहे. यात युक्रेनसाठी युद्धादरम्यान रशियाकडून कब्जा करण्यात आलेल्या डोनेस्क आणि लुहांस्क प्रांतांवरील दावा सोडणे, सैन्याचा आकार कमी करणे, नाटोत सामील होण्याची इच्छा त्यागणे आणि युद्ध संपल्यावर युरोपीय सैन्याला तैनात न करणे यासारख्या अटी आहेत.
झेलेंस्कींसोबत चर्चा करणार ट्रम्प
ट्रम्प यांनी या अटीयुक्त शांतता योजना मान्य करण्यासाठी युक्रेनवर कालमर्यादा लादली आहे. याचदरम्यान संवेदनशील मुद्द्यांवर ट्रम्प यांच्याशी चर्चा करणार असल्याचे झेलेंस्की यांनी स्पष्ट केले आहे. युक्रेनमध्ये ‘रीएश्योरेन्स फोर्स’ तैनात करण्यासाठी एका आराखड्यावर चर्चा करणे तसेच रशिया युद्ध संपुष्टात आणण्याची इच्छाशक्ती दाखवत नाही तोवर युक्रेनला पाठिंबा देत राहण्याचे आवाहन झेलेंस्की यांनी युरोपीय नेत्यांना केले आहे.
रशियाच्या हल्ल्यात 7 ठार
युद्ध संपविण्याच्या प्रयत्नांदरम्यान रशियाने मंगळवारी रात्री युक्रेनची राजधानी कीव्ह समवेत अनेक ठिकाणी 22 क्षेपणास्त्रs आणि 460 हून अधिक ड्रोन्सद्वारे हल्ला केला. या हल्ल्याद्वारे अनेक इमारती आणि ऊर्जासुविधांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे युक्रेनने दक्षिण रशियात केलेल्या हल्ल्यात तीन जणांना जीव गमवावा लागला आहे.
मतभेद दूर करण्याचे प्रयत्न
तर दुसरीकडे अमेरिका आणि युक्रेनचे अधिकारी योजनेवरील परस्परांचे मतभेद दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यानुसार स्वीत्झर्लंडच्या जीनिव्हामध्ये अमेरिका, युक्रेन आणि युरोपीय देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे. यात योजनेतील त्रुटी दूर करणे तसेच नव्या शांतता योजनेवर सहमती तयार करण्याचा प्रयत्न झाला आहे. नव्या शांतता योजनेत रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यात ऑगस्ट महिन्यात अलास्का येथे झालेल्या शिखर परिषदेत निर्माण झालेल्या सहमतीची भावना प्रतिबिंबित व्हायला हवी, असे उद्गार रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी काढले आहेत.