युक्रेनकडून मर्यादित युद्धविरामाचा प्रस्ताव
सौदी अरेबियात अमेरिका-युक्रेन यांच्यात चर्चा : अनेक मुद्द्यांवर मंथन
वृत्तसंस्था/ जेद्दा
युक्रेन आणि अमेरिका यांच्यात सौदी अरेबियात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. या बैठकीत युक्रेनकडून युद्ध रोखण्यासाठी मर्यादित संघर्षविरामाचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे समजते. हा संघर्षविराम काळा समुद्र क्षेत्र अन् दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना रोखण्यावर केंद्रीत असेल असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याचबरोबर युक्रेन युद्धात पकडण्यात आलेल्या कैद्यांच्या मुक्ततेवरही चर्चा झाली आहे. या बैठकीचा मुख्य उद्देश युक्रेन आणि रशिया यांच्यात जारी तीन वर्षे जुन्या युद्धा संपुष्टात आणण्यासाठी कूटनीतिक तोडगा काढणे आहे. याचबरोबर युक्रेन आणि अमेरिका यांच्यात युक्रेनमधील दुर्लभ खनिजसंपदेच्या उत्खननाचे अधिकार अमेरिकेला देण्यासंबंधीच्या करारावर स्वाक्षरी होऊ शकते.
युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 28 फेब्रुवारी रोजी वॉशिंग्टन येथे झालेली बैठक अत्यंत तणावपूर्ण राहिली होती. या वादामुळे अमेरिकेकडून युक्रेनसाठीची सैन्य अन् गुप्तचर मदत रोखण्यात आली होती. आता ही मदत पूर्ववत सुरू व्हावी म्हणून युक्रेन कूटनीतिक मार्ग अवलंबित संघर्षविरामाचा प्रस्ताव सादर करत आहे.
युक्रेनच्या वतीने अध्यक्ष झेलेंस्की यांची टीम या बैठकीत सामील असून यात प्रमुख सल्लागार एंड्री यरमाक, विदेशमंत्री एंड्री सिबिहा आणि संरक्षणमंत्री रुस्तम उमेरोव्ह यांचा समावेश आहे. तर अमेरिकेच्या वतीने बैठकीचे नेतृत्व विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी केले, त्यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्टज हे देखील बैठकीत सामील झाले.
झेलेंस्की अन् सलमान यांची भेट
या बैठकीपूर्वी युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांनी सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. आम्ही युद्ध समाप्त करणे आणि स्थायी शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक अटींवर विस्तृत चर्चा केली. सौदी अरेबिया या चर्चेसाठी एक महत्त्वाचा मंच ठरला आहे आणि युक्रेन याबद्दल त्याचे आभार मानतो असे झेलेंस्की यांनी म्हटले आहे.
अमेरिकेची भूमिका
युक्रेन शांतता चर्चेसाठी कितपत तयार आहे हे अमेरिका समजून घेऊ पाहत आहे. युक्रेनला या युद्धात प्रचंड नुकसान झाले आहे. ही लढाई युक्रेनसाठी अत्यंत कठिण राहिली आहे. परंतु युद्ध संपविण्यासाठी काही प्रमाणात तडजोड करावी लागेल. आम्ही युक्रेनचे म्हणणे ऐकून घेऊ आणि मग रशियाच्या स्थितीशी याची तुलना करू असे अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले आहे.