रशियातील सैन्यतळांवर हल्ल्याची युक्रेनची योजना
अमेरिकेकडून झेलेंस्की यांनी मागितली मदत
वृत्तसंस्था/ कीव्ह
युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की आता रशियाच्या आत शिरून हल्ले करण्याची योजना आखत आहे. या हल्ल्यांकरता अमेरिकेने मदत करावी असा त्यांचा आग्रह आहे. 30 ऑगस्ट रोजी रशियाने खारकीव्हवर हवाई हल्ले केले असून यात 6 नागरिकांचा मृत्यू झाला असुन 90 जण जखमी झाले आहेत. अशाप्रकारचे हल्ले युक्रेनने रशियातील वायुतळ तसेच सैन्यतळांवर लक्ष्य केले तरच रोखता येणार आहेत. आम्ही प्रतिदिन स्वत:च्या सहकारी देशांसोबत याप्रकरणी चर्चा करत आहोत. अशाप्रकारच्या कारवाईकरता त्यांची सहमती मिळवित आहोत असा दावा झेलेंस्की यांनी केला आहे.
रशियावर आम्ही हल्ले तीव्र केले तरच युक्रेनच्या आकाशातून रशियाचे बॉम्ब पडणे थांबविता येणार आहे. यानंतरच रशियासोबतचे युद्ध थांबविण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावले टाकता येणार आहेत. युक्रेनच्या रक्षणासाठी आम्हाला दीर्घ पल्ल्यापर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रs आणि रशियाच्या विरोधात त्यांच्या वापराची अनुमती आवश्यक असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे.
आमचे प्रतिनिधी याच्याशी निगडित सर्व आवश्यक माहिती युक्रेनच्या सहकाऱ्यांना पुरवत आहेत असेही त्यांनी नमूद केले. यापूर्वी 30-31 ऑगस्ट रोजी युक्रेनचे संरक्षणमंत्री रुस्तेम उमरोव्ह यांनी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे अधिकारी आणि तज्ञांची भेट घेतली होती.
युक्रेनच्या विजयाचा प्लॅन
युक्रेनच्या रक्षणासाठी कुठली शस्त्रास्त्रs हवी आहेत याची माहिती अमेरिकेच्या प्रशासनाला देण्यात आली आहे. आमची मागणी मान्य करण्यात येईल अशी अपेक्षा असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे. झेलेंस्की हे चालू महिन्याच्या अखेरीस अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी ते युक्रेनच्या विजयासाठीचा स्वत:चा प्लॅन बिडेन यांच्यासमोर मांडणार आहेत.
रशियाच्या मोठ्या भूभागावर कब्जा
अडीच वर्षांपासून सुरु असलेल्या युद्धात 6 ऑगस्ट 2024 रोजी पहिल्यांदाच युक्रेनने रशियात शिरून त्याच्या कुर्स्क भागावर कब्जा केला होता. तेव्हापासून युक्रेन सातत्याने रशियावर हल्ले करत आहेत. 20 दिवसांमध्ये युक्रेनने केलेल्या हल्ल्यांमध्ये रशियाच्या 31 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच रशियाच्या भूमीवर अन्य विदेशी शक्तीने कब्जा केला आहे. युक्रेनने दोन आठवड्यात रशियाच्या 1263 चौरस किलोमीटर भूभागावर कब्जा केला होता.