For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युक्रेन गुप्तचरप्रमुखाच्या पत्नीवर विषप्रयोग

06:43 AM Nov 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
युक्रेन गुप्तचरप्रमुखाच्या पत्नीवर विषप्रयोग
Advertisement

रुग्णालयात दाखल : अनेक सिक्रेट एजंट्सनाही ठार मारण्याचा प्रयत्न

Advertisement

वृत्तसंस्था/ कीव्ह

युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल किरिलो बुडानोव्हा यांच्या पत्नीच्या हत्येचा प्रयत्न झाला आहे. मारियाना बुडानोव्हा यांच्यावर मंगळवारी विषप्रयोग झाला आहे, यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेने यासंबंधी कुठलीही टिप्पणी करण्यास सध्या नकार दिला आहे.

Advertisement

गुप्तचर यंत्रणेशी निगडित अनेक अधिकाऱ्यांनाही (सिक्रेट एजंट्स) देखील ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. या अधिकाऱ्यांवरही विषप्रयोग झाला आहे. लेफ्टनंट जनरल किरिलो बुडानोव्हा यांनाही लक्ष्य करण्यात आले होते की नाही यासंबंधी कुठलीच माहिती समोर आलेली नाही. तर हा विषप्रयोग कुणाकडून करण्यात आला होता हे देखील जाहीर करण्यात आलेले नाही.

मारियानाला ज्या खाद्यपदार्थांमधून विष देण्यात आले होते, त्यांचा वापर दैनंदिन जीवन किंवा सैन्य मोहिमेत कुठल्याही प्रकारे होत नसल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर मारियाना यांच्यावर अनेक चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांच्या अहवालात विषप्रयोगाची पुष्टी झाली आहे. भोजनातून विष देण्यात आले होते असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मारियाना यांनी मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. याचबरोबर त्या नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये प्राध्यापिका आहेत. तेथे त्या लिगल सायकोलॉजीचे धडे विद्यार्थ्यांना देत आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून त्या पतीसोबत ऑफिसमध्येच वास्तव्य करून आहेत. चालू वर्षात लेफ्टनंट जनरल किरिलो बुडानोव्हा यांच्या हत्येचे 10 वेळा प्रयत्न झाले आहेत.

Advertisement
Tags :

.