उज्जैनमध्ये शाही मशिदीच्या भाग हटवण्यावरून तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा
उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये शाही मशिदीचा रस्ते रुंदीकरणाच्या कामासाठी प्रभावित भाग हटवण्याच्या कारवाईदरम्यान सोमवारी तणाव निर्माण झाला. कारवाईला विरोध करण्यासाठी मोठी गर्दी जमल्यानंतर काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
शाही मशिदीचा संबंधित भाग 2028 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते रुंदीकरणासाठी हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिका मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने यापूर्वी फेटाळून प्रशासनाला पुढील कारवाईचा मार्ग मोकळा केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ते रुंदीकरणाच्या प्रकल्पात मशिदीचा काही भाग येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी कारवाईच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली. त्यानंतर पोलिस आणि जमावामध्ये झटापट झाली आणि दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. काही पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी दगडफेक आणि शांतता भंग केल्याप्रकरणी सुमारे 10 जणांविरोधात एफआयआर दाखल केल्याचे वृत्त आहे. तसेच अफवा किंवा प्रक्षोभक माहिती पसरवल्याच्या आरोपावरून काही कंटेंट क्रिएटर्सविरोधातही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
सिंहस्थ 2028 च्या पार्श्वभूमीवर उज्जैनमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आणि रस्ते रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शाही मशिदीच्या प्रभावित भागाबाबत झालेल्या कारवाईमुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले असून, पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.