उजनी धरण परिसरातील विघातक प्रकल्पांविरोधात शनिवारी 'रस्ता रोको'; हजारो शेतकरी उतरणार रस्त्यावर
उजनी धरण परिसरातील सहा तालुक्यांमधील नागरिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे. करमाळा, माढा, इंदापूर, कर्जत आणि दौंडसह भीमा नदीच्या काठावरील विविध भागांतील नागरिकांनी प्रस्तावित प्रकल्पांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकल्पांमुळे शेतकरी, मच्छिमार, वारकरी आणि धरणग्रस्तांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
पाच महत्त्वाचे प्रकल्प रद्द करण्याची मागणी
उजनी धरण परिसराची पर्यावरणीय आणि भौगोलिक हानी होण्याची शक्यता व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी पाच प्रमुख प्रकल्पांना विरोध दर्शविला आहे. यामध्ये एआय डेटा सेंटर प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, बॅटरी प्रकल्प आणि सोलापूर एनर्जी प्रकल्प यांचा समावेश आहे. हे सर्व प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावेत, अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे.
प्रस्तावित प्रकल्पांमुळे स्थानिकांच्या उपजीविकेवर, शेतीवर, जलस्रोतांवर आणि पर्यावरणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली स्थानिक नागरिकांचे विस्थापन होऊ नये आणि उजनी धरण परिसराचे नैसर्गिक अस्तित्व टिकून राहावे, यासाठी हा लढा उभारण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
विविध राजकीय आणि शेतकरी नेत्यांचा सहभाग
या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटना आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा पाठिंबा मिळत आहे. आमदार रोहित पवार, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार नारायणआबा पाटील, माजी आमदार संजय शिंदे, शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी, किसान सभेचे नेते अजित नवले, वारकरी विचार मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज आणि माजी मंत्री महादेव जानकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार आहे.
उजनी परिसरातील नागरिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर
उजनी धरण हे सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील अनेक गावांसाठी महत्त्वाचे जलस्रोत आहे. या धरणावर शेती, मासेमारी आणि विविध व्यवसायांसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक अवलंबून आहेत. त्यामुळे धरण परिसरातील कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचा निर्णय घेताना स्थानिक नागरिकांचे मत, पर्यावरणीय परिणाम आणि भविष्यातील पाणीवापर यांचा विचार व्हावा, अशी आंदोलकांची भूमिका आहे.
हिंगणगाव-रांजणी येथील उजनी पुलावर होणाऱ्या या आंदोलनात हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. विविध संघटना आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
