परिप्रश्नेन सेवया
जे प्रश्न कितीही वेळा विचारले तरी त्याची आपल्याला उत्तरंच मिळणार नाहियेत, ते प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून स्वत:चं नुकसान करून घेऊ नये हेच चांगलं असतं. अशी गंमत असते, की आपल्याला कळत नसतं की भलेही आपण प्रश्न विचारू. पण विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे येणारं उत्तर पचवण्याची ताकद आपल्यात असेलच असं नाही. कोणत्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला झेपेल आणि कोणतं उत्तर आपला भ्रमनिरास करेल याचं ज्ञानसुद्धा आपल्याला अनेक अपेक्षाभंग पचवल्यावरच येतं.
‘तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया’ असं भगवंताने भगवद्गीतेतच म्हणून ठेवलेलं आहे याचा अर्थ काय? की प्रश्न पडावे लागतात. आयुष्याचा अर्थ कळायला हवा असेल तर मुळात आयुष्य म्हणजे काय आहे, कसं जगायचं असतं, का जगायचं, कोणत्या पद्धतीने जगायचं, इत्यादी इत्यादी सगळे प्रश्न जेव्हा पडायला सुरुवात होते तेव्हा त्या प्रश्नांच्या मिळणाऱ्या उत्तरातून आपली प्रगती सुरू झालेली असते असं म्हणायला हरकत नाही. परंतु आपल्याकडे एकंदरीत मधल्या काळात प्रत्येक गोष्टीचं अंधानुकरण करण्याची सवय वाढतच गेली आणि बऱ्याच बाबतीत अशी प्रथा सुरू झाली की समोरच्याने सांगितलं की ते गप्पपणे ऐकून घ्यायचं. त्याच्यावरती परत शंका काढायच्या नाहीत. प्रश्न विचारायचे नाहीत. मान खाली घालायची आणि गपगुमान ते करायचं. यामुळे झालं काय की ‘सणासुदीला मांजर टोपलीखाली’ अशी अवस्था झाली. ‘सणासुदीला मांजर टोपलीखाली’ याची कथा अशी, की एका ठिकाणी सणासुदीचा स्वयंपाक चालू होता. आसपास मांजर फिरत होती. मांजर स्वयंपाकात तोंड घालायला आलं. त्याने तसं करू नये म्हणून सगळा स्वयंपाक होऊन जेवणं होईपर्यंत त्या मांजराला टोपलीखाली झाकून ठेवण्यात आलं आणि मग सोडण्यात आलं. असं का केलं जात आहे याचा विचार पुढच्या पिढीने केला नाही. सणासुदीचा स्वयंपाक सुरू झाला की मांजर धरून त्याला टोपलीखाली घालणं चालू राहिलं.
पुढच्या पिढीत तर अशी गंमत झाली की सणासुदीचा स्वयंपाक सुरू झाला की मांजर हे टोपलीखाली घालावंच लागतं नाहीतर रीतभात पाळली जात नाही इथपर्यंत पोहोचलं. आणि त्यासाठी स्पेशल मांजराचा शोध घेणं सुरू झालं. परंतु त्यातल्या एकालाही असा प्रश्न पडला नाही, की सणासुदीला मांजरं टोपलीखाली का ठेवतात?
बऱ्याचशा रूढी परंपरांच्या पुढे जाऊन अंधश्रद्धा का होतात याचं उत्तर आपल्याला एका दृष्टांताने मिळालं असेल. योग्य ठिकाणी प्रश्न विचारून एखाद्या गोष्टीचा कार्यकारणभाव जाणून घ्यायलाच आपण कमी पडत असतो. असं का होतंय हे काय चाललंय एखादी गोष्ट आपल्याला करायला सांगितली असेल तर ते का करायचे आहे हे जाणून घेणं आवश्यक असतं कारण जाणून घेतल्यावरच ती गोष्ट आपण परिपूर्ण आणि व्यवस्थित करू शकतो. याचा अर्थ असा नक्कीच नाही की निरर्थक प्रश्न निर्माण करून वाद वाढवत बसावा. दर प्रश्नाला प्रति प्रश्न असलाच पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नाहीये. किंबहुना तो असू नयेच. आपल्या पूर्वजांनी तर ‘वादे वादे जायते तत्वबोध:’ हेही सांगून ठेवलंय. परत पुढे जाऊन समर्थांनी असंही सांगितले की ‘तुटे वाद संवाद तो हीतकारी’. म्हणजे प्रश्न कसे आणि किती विचारावेत यालाही संकेत घालून दिलेला आहे
ज्या प्रश्नांनी निरर्थक वाद उभा राहील असे प्रश्न न विचारलेलेच बरे असतात. जे प्रश्न कितीही वेळा विचारले तरी त्याची आपल्याला उत्तरंच मिळणार नाहियेत, ते प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून स्वत:चं नुकसान करून घेऊ नये हेच चांगलं असतं. अशी गंमत असते, की आपल्याला कळत नसतं की भलेही आपण प्रश्न विचारू. पण विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे येणारं उत्तर पचवण्याची ताकद आपल्यात असेलच असं नाही. कोणत्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला झेपेल आणि कोणतं उत्तर आपला भ्रमनिरास करेल याचं ज्ञानसुद्धा आपल्याला अनेक अपेक्षाभंग पचवल्यावरच येतं. ते अपेक्षाभंग पचवायलाही मुळात अपेक्षा करावी लागते. तिचा भंग व्हावा लागतो आणि अपेक्षाभंग झाल्यावर त्यावर विचारलेला प्रश्न आपल्याला खरोखर शिकवून जात असतो. कारण त्या प्रश्नांच्या उत्तरामुळे होणारं दु:ख अपेक्षाभंगाच्या दु:खापेक्षाही खूप मोठं असतं. आयुष्य जेव्हा वयात येतं त्यावेळेला ते प्रश्नांमागून प्रश्नांची एक मालिकाच आपल्यासमोर उभी करत असतं. आता आपण प्रश्न विचारणाऱ्याच्या पक्षातून उत्तर देणाऱ्याच्या पक्षात येऊन थांबतो. मग आपल्या लक्षात येतं की आपल्याला होणारं दु:ख आपल्याला जाणवणारं नैराश्य, आपले होणारे अपेक्षाभंग, हे आपण प्रश्न विचारतो म्हणून होत नाहीत. ते होतात कारण आपण हतबल होतो. आपण प्रश्न विचारताना सुद्धा उत्तर देणाऱ्याकडून अपेक्षा करून लाचार होतो आणि भंग हतबल होतो. हीच बेफिकीर माणसं जेव्हा चवताळून आपल्या अंगावर येतात आणि आपल्याला नको नको ते प्रश्न विचारून विव्हल करून सोडतात तेव्हाही हतबल होण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नसतं. प्रश्नांच्या ह्या बाजूला असा किंवा त्या बाजूला असा फरक पडतो तो तुमच्या मनोभूमिकेने.
आता आपल्याला लक्षात आले असेल की माणसं बेफिकीर का होतात? माणसं प्रश्नावर प्रश्न विचारून किंवा उत्तर देणंच टाळून तुम्हाला यातना का देतात? त्याचं कारण एवढंच आहे की त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रश्न विचारत राहून किंवा स्वत:च्या मनाला प्रश्न विचारत राहून जास्तीत जास्त माहिती मिळवलेली असते. जास्तीत जास्त ज्ञान गोळा केलेलं असतं. फरक फक्त एवढाच असतो की गोळा केलेली माहिती किंवा ज्ञान ते तुम्हाला त्रास देण्यासाठी किंवा तुमच्या विरोधात वापरत असतात. पण ज्ञान घेणं काही चुकत नसतं. आपण विचारलेल्या प्रश्नांना जर व्यक्ती उत्तर देत नसेल मुद्दाम दुर्लक्ष करत असेल, तर आपल्याला उत्तर मिळणार कसं? आपल्याला माहिती मिळणार कशी? हा प्रश्न पडतो ना? पण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अशी सहजासहजी मिळत नसतात. आयुष्य एवढं सोपं नक्कीच नसतं. तर अशावेळी करावं तरी काय? तर ज्या वेळेला व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करत असेल तेव्हा समजून जावं की असं करून आपल्या मनाला त्रास देण्याची ही खेळी आहे. अशावेळी आपण दुर्लक्ष करावं. कोणत्या प्रश्नांची उत्तरं मिळणारच नाहीत हे ओळखायला शिकावं. हे ओळखायला शिकलो की आयुष्याने विचारलेल्या प्रश्नांपैकी एका तरी प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या वेळेला मिळालेलं असतं. आता विषय येतो तो आपल्यावर डागलेल्या फैरींचा! मुद्दामच आपल्याला त्रास देण्यासाठी, हताश करण्यासाठी, निराश करण्यासाठी प्रश्नांमधून प्रश्न विचारले जातात. आपल्या न केलेल्या चुका मोजून दाखवल्या जातात. ज्या गोष्टी एकाचवेळी एका व्यक्तीला माहीत असणे शक्य नाही इतक्या अशक्य कोटीतले प्रश्नही विचारले जातात. आणि त्याची उत्तरं का नाही आली म्हणून आपल्याला अपरिमित मानसिक त्रासही दिला जाऊ शकतो. आपल्या प्रश्नांचे उत्तर देणं टाळणे असो, किंवा आपल्याला उत्तरंच देता येणार नाहीत इतके सटासट प्रश्न विचारणे असो. दोन्हीचा हेतू विचारी माणसाच्या चटकन लक्षात येतो. ती व्यक्ती असे प्रश्न यशस्वीपणे हाताळायला शिकते.
ज्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत, ती न देणारी व्यक्ती ही भ्याडही असू शकते हे लक्षात घेऊन तिला प्रश्न विचारणं बंद करते. तोच प्रकार आपल्याकडे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा आपल्याला ज्या प्रश्नांची उत्तरे निश्चित माहित आहेत त्याचे ठाम आणि शांत स्वरात उत्तर देणे आणि जे माहिती नाहीत ते माहीत नाही म्हणून तितक्याच शांत स्वरात सांगणे हाच यावरचा उपाय असतो. कारण अपेक्षित तो गोंधळ साध्य झाला नाही की आपोआपच प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीची बंदूक थंड पडायला सुरुवात होते. आपण हिला मानसिक त्रास देऊ शकत नाही हे एकदा का त्यांच्यासमोर स्वच्छ झालं की त्यांना त्यांचे हे दुष्ट, विकृत प्रयत्न थांबवावेच लागतात. कारण दुर्गुणांना भांडायला जोडीदार लागतो. थोडक्यात प्रश्नांच्या जगापैकी एक बाजू ही अशी आहे. तिच्याकडे तटस्थपणे बघायला साधलं की आपल्याला ‘मैं ऐसा क्यूँ हूँ?’ हा प्रश्न स्वत:ला विचारायची वेळ येत नाही.
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु