For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्धवा, ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याला उपदेश कर

06:36 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
उद्धवा  ज्याचा जसा अधिकार असेल तसा त्याला उपदेश कर
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

भगवंत म्हणाले, जोपर्यंत जाणते सद्गुरू निरहंकारी असतात तोपर्यंत त्यांच्या ज्ञानाला तेज असते. त्यामुळे त्यांची कृपा झाल्या झाल्या सच्छिष्याला बोध होतो. तुला माझ्याकडून मिळालेला ज्ञानाचा उपदेश तू शिष्यांना दे. तू असे करत असताना ते तुला सन्मान देतील. तुझा आदर करतील. त्यातूनच ज्ञानाचा अभिमान होऊ शकतो म्हणून तू सदैव सावध रहा. तुझ्यासारख्या ज्ञात्याने शिष्यांनी दिलेला सन्मान हा आपल्या ज्ञानाला दिलेला असून तो तुला वैयक्तिक दिलेला नाही हे लक्षात घेऊन, तू तुझ्या ज्ञानाचा अभिमान धरू नकोस. हे ज्ञान्याचे लक्षण असल्याने, जो असे करेल तो खरा ज्ञानी म्हणून ओळखला जातो. एकटा असताना किंवा लोकात वावरत असताना कायम निराभिमानी अवस्थेत रहा. म्हणजे तुला स्वानंदाची अनुभूती येत राहील. म्हणून तू शिष्यांना कायम निराभिमानी स्थितीत राहण्याचा उपदेश कर. त्यांना पुढं असं सांग की, कायम निराभिमानी राहण्यासाठी सतत देवाची आठवण ठेवा म्हणजे तो कर्ता आहे हे आपोआपच लक्षात येऊन झालेला अभिमान गळून पडेल. देवाची सतत आठवण राहण्यासाठी वाचेने त्याचे सतत नाम संकीर्तन करत रहा. त्यामुळे त्याचे मन सतत देवाशी जोडलेले राहील. जो कायम निराभिमानी असतो त्याची म्हणून काही खास लक्षणे असतात तीही तुला सांगून ठेवतो. पहिले लक्षण म्हणजे, हा ज्ञाता आहे असे म्हणून त्याचे कुणी कौतुक केले तर त्याचा त्याला आनंद वाटत नाही किंवा मूर्ख म्हणून त्याची कुणी संभावना केली तर त्याला राग येत नाही. तो कायम स्थिरचित्त असतो. कायम निराभिमानी असणे हे त्याचे दुसरे लक्षण समज. स्वत: ईश्वराची भक्ती करत करत तो वैराग्याचे प्रदर्शन करत असतो. त्यातही त्याचे ज्ञान दिसून येते. वैराग्य म्हणजे आहे त्या परिस्थितीत कोणताही बदल नको असे वाटणे. समाजात वावरत असताना अनुकूल परिस्थितीत तो हुरळून जात नाही की प्रतिकूल परिस्थितीत गडबडून जात नाही. अशा पद्धतीने भक्तियुक्त वैराग्याचे ज्ञानपूर्वक आचरण करत तो शिष्य, सज्जनांना त्याप्रमाणे वागण्याचा उपदेश करत असतो. तो स्वत: त्याप्रमाणे वागत असल्याने त्याचा शिष्यांवर चांगलाच प्रभाव पडून तेही श्रद्धेने त्याचे अनुकरण करून त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. निराभिमानी सद्गुरूंची लक्षणे सांगून झाल्यावर भगवंत पुढे उद्धवाला त्याने शिष्यांशी, विशेषत: जे त्याच्या अज्ञापालनात कुचराई करत असतात त्यांच्याशी सद्गुरू म्हणून कसे वागावे ते सांगत आहेत. ते म्हणाले, तुला जे शरण येतील त्यात चांगले वाईट अशा स्वभावाचे लोक असतील. जे चांगले असतील त्यांना तुझ्याबद्दल आदर वाटत असल्याने तुझा उपदेश ते शिरोधार्य मानून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतील पण जे दुष्ट स्वभावाचे असतील त्यांना तू नीच म्हणू नकोस कारण सर्वांच्यातच ईश्वराचा वास असल्याने सर्वजण वंद्यच असतात, हे लक्षात घेऊन सगळ्यांच्याबद्दल पूज्यभाव बाळगणे हे पूर्ण गुरुत्वाचे लक्षण आहे. सद्गुरुंना सर्वाभूती नेहमीच ब्रह्मप्रतीती येत असते. असे असताना जे शरण आलेले असतील त्यांच्या ठिकाणी ब्रह्मस्थिती नाही असे म्हणता येईल का? म्हणून शिष्य चांगला आहे की वाईट आहे हे न पाहता शिष्य हा परिपूर्ण ब्रह्म आहे असे पाहणे हेच सद्गुरूंचे मुख्य लक्षण आहे. ज्याप्रमाणे ताह्या मुलाबद्दल वाटणाऱ्या कळवळ्याने त्याची माता सर्वकाही करायला तयार असते त्याप्रमाणे सद्गुरुंना शिष्याबद्दल कळवळा वाटत असतो. मग तो चांगला असो की वाईट असो. ह्या शिष्याबद्दल सद्गुरुंना वाटणाऱ्या कळवळ्याला शुद्ध ‘सद्गुरुता’ असे म्हणतात. उत्तम शिष्य कुणाला म्हणावे, शिष्याचे पाणी कसे ओळखावे ह्याबद्दल मी तुला पूर्वी सांगितले आहेच. त्यानुसार शिष्य कोणत्या पायरीवर उभा आहे हे ओळखून ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे त्याला उपदेश कर.

Advertisement
Advertisement
Tags :

.