मंत्री दीपक केसरकर अदानींचे दलाल !
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सावंतवाडीत घणाघाती टीका
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर आणि तिंबलो हे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या सीमेवर जागा शोधत होते. ते कुठल्या शाळेसाठी, कॉलेजसाठी , हॉस्पिटलसाठी किंवा विनाश न करणाऱ्या प्रकल्पासाठी जागा शोधत नव्हते तर अदानींच्या गोल्फ कोर्ससाठी जागा शोधत होते. हे दोघे अदानींचे दलाल म्हणून कोकणात येऊन माझ्या कोकणवासियांना फसवतात. तुमच्या काजू ,आंबा बागायती ,भात शेतीच्या सातबारावर अदानीचे नाव कशावरून नसणार असा सवाल करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गांधी चौकात झालेल्या जाहीर सभेत करत अदानीचे भूत तुम्ही आणि आम्ही आताच गाडून कोकणला वाचवले पाहिजे असे आवाहन केले. महाविकास आघाडीचे तथा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ गांधी चौकात आयोजित सभेत केले. या सभेत त्यांनी केसरकर आणि राणे यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला . यावेळी उमेदवार राजन तेली, माजी खासदार विनायक राऊत, उपनेते शरद कोळी ,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले ,माजी खासदार सुधीर सावंत ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी ,सावंतवाडी संपर्कप्रमुख शैलेश परब ,आमदार मिलिंद नार्वेकर ,महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, जिल्हा प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर ,माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर ,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप नार्वेकर ,शिवसेना सावंतवाडी मतदार संघ प्रमुख रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख मायकल डिसोजा ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ,महेंद्र सांगेलकर, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, समीर वंजारी दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस ,वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर घणाघात केला. त्यांना आपणच मोठे केले होते . परंतु, खाली मुंडी पातळ धुंडी अशी त्यांची वृत्ती आहे. नेहमी खाली बघूनच बोलत असतात. 2014 ला मोठा आव आणला होता आम्हाला वाटलं चांगला आणि सज्जन आहे . साईबाबांचा भक्त आहे . शिर्डीला जातो. परंतु मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशा प्रकारचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांना देव कसा पावणार ? ती उपरोधिक टीका केसरकर यांच्यावर करून ठाकरे यांनी मी सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आणले होते त्यासाठी पैसेही मंजूर केले होते . जागेचा प्रश्नही होता. मधल्या काळात ज्या घटना घडल्या त्यानंतर हे हॉस्पिटल ते पूर्णत्वास आणू शकले नाही. हे हॉस्पिटल ते का पूर्ण करू शकले नाही असा प्रश्न करीत ठाकरेंनी आमचं सरकार आल्यानंतर हे हॉस्पिटल उभारू अशी ग्वाही दिली. लोकांच्या हक्काच्या जागा खेचून मायनिंग आणि इतर प्रकल्पासाठी ओरबडून घ्यायच्या आणि त्या अदानीच्या चरणी करायच्या असे प्रकार चालले आहेत . आपल्या हक्काच्या मुंबईच्या जागा अदानीच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. परंतु आमचे सरकार आल्यानंतर या जागा पुन्हा परत घेऊन तेथे गिरणी कामगारांना परवडेल अशा दरात आम्ही घरे देणार आहोत . हे अदानीचे दलाल आहेत. सबका मालिक एक हे यांचे घोषवाक्य आहे परंतु सबकुछ अदानी यांची वृत्ती आहे. साईबाबा सबका मालिक एक असे सांगत होते परंतु हे सब कुछ अदानी करत आहेत. अशी टीका ठाकरेंनी मंत्री दीपक केसरकरांवर केली .