उध्दव ठाकरेंचे काँग्रेसबरोबर जाणे म्हणजे गद्दारीच
कोल्हापूर :
2019 च्या विधानसभा निवडणूकीत भाजप आणि शिवसेना युती एकत्र लढली. या निवडणूकीत युतीला बहुमत मिळाले. पण शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे हिंदुत्ववाला विरोध करणाऱ्या काँग्रेसबरोबर गेले. हे वर्तन न शोभणारे व गद्दारीचे होते, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषदेत केली.
यावेळी विनोद तावडे म्हणाले, लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा 0.3 टक्के अधिक मते मिळाली आहेत. पण महाविकास आघाडी आणि महायुतीची लढत समोरासमोर झाली होती. लोकसभेला असलेले वातावरण विधानसभा निवडणूकीत राहत नाही. राज्यात तिसरी आघाडीसह अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तिसरी आघाडी आणि अपक्षामुळे मतांचे विभाजन होऊन हरयाणाप्रमाणे भाजपाला सकारात्मक वातावरण होऊन महाराष्ट्रासह झारखंडमध्ये भाजपची सत्ता येईल असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.
2019 च्या विधानसभा निवडणूकीत भाजप-शिवसेना बहुमत असताना उध्दव ठाकरे काँग्रेसबरोबर गेले, ही गद्दारी होती. यामुळे राजकारण बिघडत गेले. हम किसी को छेडेंगे नही,अगर छेडोगे तो छोडेंगे नही असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्राचे राजकारण गेल्या पाच वर्षात वेगळया स्तरावर गेले असल्याचे ते म्हणाले. रोज सकाळी 9 वाजता कोणीतरी वक्तव्ये करतो त्यानंतर त्यावर उत्तरे येतात. हे महाराष्ट्राचे राजकारण नव्हे. यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात व्यक्तीगत कोणी घेत नव्हते. भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर सर्वच पक्षातील नेते पोटतिडकीने बोलत असत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणूक लढवत आहे. पण निवडणूकीनंतर सर्व एकत्र बसून चर्चा करुन मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजना बंद करेल. यामुळे महायुतीला निवडून देण्याचे आवाहन तावडे यांनी केले. पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे उपस्थित होते.
बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे
राष्ट्रीय स्तरावर काम करताना आनंद मिळत आहे. वेगळे शिकायला मिळत आहे.म्हणून राष्ट्र प्रथम,नो महाराष्ट्र म्हणत बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले.