उद्धव ठाकरे यांचा ताफा निवडणूक आयोगाच्या पथकाने रोखला
इन्सुली तपासणी नाका येथे फक्त गाडीची पाहणी ; बॅगा तपासण्या टाळल्या
मयुर चराटकर
बांदा
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा अलर्ट झाली असून पोलीस कर्मचाऱ्यांसह निवडणूक आयोगाचेही कर्मचारी गोव्यातून सिंधुदुर्ग मध्ये येणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी करीत आहेत. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅग सलग दोन दिवस वणी व औसा येथे निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आली होती. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभा असून ते व्हाया गोवा सिंधुदुर्ग दौऱ्यावर दुपारी एकच्या सुमारास बांदा पोलिसांच्या इन्सुली तपासणी नाका येथे आले . इन्सुली तपासणी नाका येथे उपस्थित निवडणूक पथकाने त्यांचा ताफा रोखला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांचे सुपुत्र तेजस ठाकरे एका गाडीत होते त्यांच्या गाडीची पाहणी केली. त्यानंतर त्यांच्या ताफ्यात असलेल्या अन्य गाड्यांची तपासणी पथकातील कर्मचारी यांनी केली. यावेळी काही काळ गाडीकडे कोणी अधिकारी व कर्मचारी न आल्याने माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गाडी का थांबवली अशी विचारणाकेली असता कोणीच कर्मचारी येईना त्यावेळी ताफ्यात असलेले शिवसेनेचे पदाधिकारी शैलेश परब यांनी उपस्थितांना गाडी का थांबवली अशी विचारणा केली मात्र यावेळी कोणीच काही न बोलल्याने पुढील वाहनांना रवाना होण्याच्या सूचना दिल्या. सलग दोन दिवस प्रचार दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची हेलिपॅडवरच तपासणी करण्यात आली विशेष म्हणजे त्याचा व्हिडिओही व्हायरल करण्यात आला होता. बॅगांची तपासणी न करता आज केवळ गाडीची पाहणी करून पथकातील सर्व कर्मचारी अन्य गाड्यांची तपासणी करण्यासाठी गेले.