For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

गोकुळच्या सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंची उडी; सतेज पाटलांना फोनवरून पाठिंबा; कोल्हापुरातील दूध संघाच्या राजकारणाला नवे वळण

04:36 PM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोकुळच्या सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंची उडी  सतेज पाटलांना फोनवरून पाठिंबा  कोल्हापुरातील दूध संघाच्या राजकारणाला नवे वळण
Advertisement
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला आता राज्यस्तरीय पाठिंबा मिळू लागला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा करत गोकुळच्या सत्तासंघर्षात त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. ‘लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याने या संघर्षाला नवे राजकीय वळण मिळाले आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकत बहुमत मिळवले होते. तर महायुतीच्या वाट्याला 12 जागा आल्या होत्या. मात्र, निवडणुकीनंतर शासनाकडून चार संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अध्यक्ष निवडीचे राजकीय गणित बदलले आहे.

Advertisement

बहुमताचा आकडा गाठण्याच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष निवड प्रक्रिया गुंतागुंतीची बनली असून, शासननियुक्त संचालकांच्या निर्णयावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या निर्णयामुळे गोकुळमधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांना फोन करून चर्चा केली. गोकुळच्या लढाईत ठाकरे गट त्यांच्या सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या पाठिंब्यामुळे कोल्हापुरातील राजकीय संघर्षाला राज्यस्तरीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

Advertisement

दरम्यान, या प्रकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भूमिका घेतल्याने गोकुळचा वाद आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. शासननियुक्त संचालकांच्या निर्णयावरून विरोधकांकडून टीका सुरू असून, शिंदे गटातही या निर्णयाबाबत नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड आणि शासननियुक्त संचालकांच्या भूमिकेमुळे आगामी काळात कोल्हापुरातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.