For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Politics News : उद्धव ठाकरेंसमोर संघटनात्मक आव्हानांचा डोंगर 

01:18 PM Jun 29, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur politics news   उद्धव ठाकरेंसमोर संघटनात्मक आव्हानांचा डोंगर 
Advertisement
कोल्हापूर : राज्य पातळीवरील घडामोडींचे पडसाद आता जिल्हास्तरावरही उमटू लागले आहेत. कोल्हापूरमध्ये ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिलेला राजीनामा हा केवळ एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा नसून, पक्षातील अंतर्गत अस्वस्थतेचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
कोल्हापुरातील ठाकरे शिवसेनेत अंतर्गत मतभेद नवीन नाहीत. कारण रविकिरण इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतरही पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी तर उघडपणे नाराजी व्यक्त करत उपनेतेपदाचा राजीनामाही दिला होता. पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर हा वाद तात्पुरता मिटला, मात्र नाराजी पूर्णपणे संपली नाही. आणि पक्षात दोन गट पाहायला मिळायचे.
यानंतर स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीवेळीही वाद उफाळून आला. सुनील मोदी यांना संधी दिल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते. या घटनांमधून पक्षातील गटबाजी अधूनमधून समोर येत राहिली. त्यानंतर रविकिरण इंगवले आणि शहरप्रमुख मंजीत माने यांच्या संभाषणाची सोशल माध्यमावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. अशा अनेक घटनामधून ठाकरे शिवसेनेनेतील अंतर्गत बाद नेहमीच समोर आला आहे.
तर ठाकरे शिवसेना पुन्हा सक्षमपणे उभी राहू शकते. पक्षातील नाराजी दूर करून संघटनात्मक एकजूट निर्माण करण्यात नेतृत्वाला यश आले, तर ठाकरे शिवसेना पुन्हा सक्षमपणे उभी राहू शकते. मात्र, मतभेद कायम राहिले आणि गळती सुरूच राहिली, तर त्याचा परिणाम पक्ष संघटनेवर होणार हे मात्र निश्चित आहे.
परंतु कोणत्याही पक्षाची खरी ताकद केवळ लोकप्रतिनिधींमध्ये नसते, तर तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये असते. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवून ठेवणे, संवाद वाढवणे आणि अंतर्गत  मतभेदांवर वेळेस तोडगा काढणे, हीच ठाकरे शिवसेनेच्या भविष्यासाठी सर्वात मोठी गरज ठरणार आहे.
आता रविकिरण इंगवले यांनी राजीनामा दिल्यानंतर केलेल्या वक्तव्यांनीही राजकीय चर्चाना वेग आला. जिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेवर काँग्रेसचा प्रभाव वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यातील पक्षाचे निर्णय काँग्रेसच्या प्रभावाखाली घेतले जात असल्याचा दावा त्यांनी केला. या आरोपांमुळे महाविकास आघाडीतील समन्वय आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण आले.
कार्यकर्त्यांची निष्टा कायम; पण संभ्रमही वाढला.. 
या सर्व घडामोडींमध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे तळागाळातील शिवसैनिकांची निष्ठा. अनेक जुने कार्यकर्ते आजही उध्दव ठाकरे आणि मातोश्रीशी भावनिकदृष्ट्या जोडलेले आहेत. पक्षावर संकट आले तरी अनेक शिवसैनिक पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत. मात्र, दुसरीकडे ज्यांना पक्षाने खासदार, आमदार किंवा महत्त्वाची पदे दिली, तेच नेते पक्ष सोडताना दिसत असल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
नेतृत्वावर विश्वास ठेवावा की स्थानिक नेतृत्वाच्या भूमिकेकडे पाहावे, असा प्रश्न अनेक कार्यकत्यांसमोर उभा राहत आहे. आज ठाकरे शिवसेनेसमोर सर्वात मोठे आव्हान केवळ निवडणुका जिंकण्याचे नाही, तर पक्षाची संघटनात्मक पुनर्बाधणी करण्याचे आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संघटन पुन्हा उभे करणे, नाराज पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे,
नव्या नेतृत्वाला संधी देणे आणि जुन्या कार्यकत्यांचा आत्मविश्वास कायम ठेवणे, ही मोठी जबाबदारी पक्ष नेतृत्वासमोर आहे. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षातील संवाद वाढवणे, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि स्थानिक स्तरावरील मतभेद वेळेत सोडवणे आवश्यक आहे. पक्षाचे प्रमुख उन्द्रव ठाकरे यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांच्यासमोर आता हे दुहेरी आव्हान आहे.
आत्मचिंतनाची बेल?
राजकीय पक्षांमध्ये मतभेद असणे ही नवी गोष्ट नाही. मात्र, हे मतभेद सातत्याने असतील, तर त्यामागील कारणांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असते. २०२२ मधील मोठ्या फुटीनंतरही पक्षातून नेते बाहेर पडत असल्याने नेतृत्व, संघटन रचना, स्थानिक समन्वय आणि कार्यकर्त्यांशी संवाद या सर्व बाबींचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
Advertisement
Advertisement
Tags :

.