मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला उद्धव ठाकरे
► प्रतिनिधी/ मुंबई
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आरपारची भूमिका घेणाऱ्या ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. मात्र ही भेट केवळ अभिनंदनापूरती नसून यामागे अनेक अर्थ असल्याचं मत राजकीय तज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.
मंत्रीमंडळ विस्तारानंतर आधीच महायुतीतील तीन ही पक्षात नाराजांची संख्या वाढलेली आहे. त्यातच ठाकरे यांनी फडणवीसांची भेठ घेतल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निर्वाणीची भाषा वापरली. फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी उद्धव ठाकरेंनाही फोन करून निमंत्रण दिलं होतं. मात्र ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही फडणवीसांनी महाराष्ट्रातील बिघडलेली राजकीय संस्कृती सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता ठाकरेंकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आल्याची चर्चा आहे. ठाकरे आणि फडणवीस भेठीने मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी गटात अस्वस्थता पहायला मिळत आहे.
आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब, आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई आणि सचिन अहिर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
10 ते 15 मिनिटे चर्चा
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ 49 जागा मिळाल्या आहेत. यात शिवसेनेला सर्वाधिक 20 जागा जिंकता आल्या आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येपैकी 10 टक्के जागा जिंकणे गरजेचे आहे, असा पायंडा आहे. मात्र एकाही पक्षाला 29 जागा जिंकता आलेल्या नाहीत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरेंनी भेट घेतल्याचे सांगितले जाते. या भेटीनंतर त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बातचीत करताना या भेटीबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जाती, अशी या सरकारकडून अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त ही निवडणूक कशी जिंकली वैगरे हे प्रश्न आहेतच. त्याबाबत जनतेत जाऊन आवाज उचलत राहू.