For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारांची बैठक

06:38 AM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारांची बैठक
Advertisement

- चार आमदारांच्या अनुपस्थितीने अनेक तर्कवितर्क

Advertisement

त.भा. प्रतिनिधी, मुंबई,

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिल्यानंतर पक्षात निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवालय येथे सर्व आमदारांची तातडीची बैठक घेतली. पावसाळी अधिवेशनातील विरोधकांची रणनीती ठरविण्याबरोबरच बंडखोर खासदारांविरोधातील पुढील राजकीय लढ्याची दिशा या बैठकीत निश्चित करण्यात आल्याचे समजते. मात्र, या बैठकीलाही चार आमदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले गेले.

Advertisement

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या बैठकीला विधानसभेतील आणि विधान परिषदेतील आमदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. विधानसभा आणि विधान परिषदेतील ठाकरे गटाच्या 26 आमदारांपैकी 22 आमदार बैठकीला उपस्थित होते, तर चार आमदार गैरहजर राहिले. बैठकीत राज्य सरकारला अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर घेरायचे, संघटनात्मक बांधणी कशी मजबूत करायची आणि पक्ष सोडून गेलेल्या खासदारांविरोधात जनतेत कसा राजकीय संघर्ष उभारायचा, यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा स्वतंत्र आढावाही घेण्यात आला असून, उद्धव ठाकरे स्वत: त्या मतदारसंघांचा दौरा करून पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडणार असल्याचे संकेत बैठकीत देण्यात आल्याचे समजते.

बैठकीनंतर पक्षाच्या नेत्यांनी सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामागे ठामपणे उभे असल्याचा दावा केला. सहा खासदारांच्या जाण्यामुळे पक्षात कोणतीही फूट पडलेली नसून संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बैठकीला अनुपस्थित आमदार

संजय पोतनीस, राहुल पाटील, संजय दरेकर, सुनील शिंदे.

Advertisement
Tags :

.