कोकणात पक्ष सावरण्याचे उद्धव ठाकरेंसमोर आव्हान
कोकण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत येथे ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा पराभव झाला. रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभेच्या दोन्ही जागा महायुतीने जिंकल्या तर विधानसभेत येथील 16 पैकी 15 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. केवळ गुहागरमधून ठाकरे शिवसेनेचे भास्कर जाधव हे एकमेव आमदार निवडून आले. कोकणचा हा बालेकिल्ला ढासळला असताना आता विधानसभेत ठाकरे सेनेकडून लढलेल्या माजी आमदारांसह आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, जि. प. चे पदाधिकारीसुद्धा ठाकरेंची साथ सोडून एकामागोमाग शिंदेंच्या शिवसेनेत किंवा भाजपमध्ये दाखल होऊ लागले आहेत. तर काही जाण्याच्या मार्गावर आहेत.
शिवसेनेच्या स्थापनेपासून कोकणचे शिवसेनेशी किंबहुना ठाकरे कुटुंबियांशी एक अतूट नाते राहिले आहे. आजवरच्या वाटचालीत शिवसेनेला वेळोवेळी कोकणवासीयांची मोलाची साथ लाभली आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यात कोकणातील मतदारांचा नेहमीच सिंहाचा वाटा असतो. 2005 मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंडाचे निशाण रोवल्यानंतर लोकसभा-विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला काही मोठे पराभव स्वीकारावे लागले होते. पण पराभवांची ही मालिका फार लांबली नाही. ठाकरेंनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सोबतीने रत्नागिरी-सिंधुदुर्गचा गड पुन्हा काबीज केला. पण भाजपबरोबरची पारंपरिक युती तुटल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेची कोकणात पिछेहाट सुरू झाली आहे आणि ती थोडीथोडकी नसून खूप मोठी आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या दोन प्रमुख पक्षांसोबतची महाविकास आघाडी ठाकरेंना फायदेशीर ठरली. पण कोकणात रायगड व रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या दोन्ही जागा ठाकरेंनी गमावल्या. विधानसभेलाही 16 पैकी केवळ एकच जागा जिंकता आली. कारण कोकणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्यामुळे दोन्ही निवडणुकांमध्ये ठाकरेंची भिस्त प्रामुख्याने ‘उद्धव यांची शिवसेना हीच खरी शिवसेना’ असे मानणाऱ्या मतदारांवरच जास्त राहिली. ठाकरेंची मशाल लाखो मतदारांनी उत्स्फूर्तपणे हातात घेतली. परंतु विजयासाठी आवश्यक असलेली महत्वपूर्ण झेप काही ठाकरेंना घेता आली नाही. अशातच आता ज्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या पक्षाची धुरा सांभाळली असे काही प्रमुख नेते आणि पदाधिकारी सत्तेच्या दिशेने शिंदेंच्या शिवसेनेची किंवा भाजपची वाट धरू लागले आहेत.
रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील माजी आमदारांसह अनेक जि. प. माजी पदाधिकारी, नगराध्यक्ष व नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशांचे एक वैशिष्ट्या म्हणजे, शिंदेंच्या शिवसेनेतील विद्यमान आमदारांविरोधात निवडणूक लढवलेल्या पराभूत उमेदवारांना मात्र आपल्या पक्षात प्रवेश न देण्याचे धोरण भाजपने अवलंबिल्याचे दिसते. माजी आमदार राजन साळवी हे सुरुवातीला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर राजन साळवी (राजापूर) यांच्यासह संजय कदम (दापोली) या दोन्ही माजी आमदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला.
खरे तर, लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती बरीच मागे पडल्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडीतील अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु देशाबरोबरच राज्यातही भाजपप्रणित महायुती सरकार प्रस्थापित झाल्याने त्यांची निराशा झाली. मग आता हाती सत्ता नाही तर करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. यातूनच आता ठाकरेंचे अनेक शिलेदार सत्तेच्या दिशेने खेचले जात आहेत. राजकारणात आपले अस्तित्व टिकवण्याबरोबरच आपला व्यावसायिक विस्तार करायचा असेल तर हाती सत्ता पाहिजे, या विचाराने माजी आमदार, जि. प. पदाधिकारी, नगरसेवक ठाकरेंची साथ सोडू लागले आहेत. राज्यात ‘ऑपरेशन टायगर’मध्ये ठाकरे शिवसेनेचे विद्यमान खासदार, आमदार गळाला लागले नसले तरी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेनेतील माजी आमदार व इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या शिवसेनेत घेण्याचा सपाटाच लावला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वत:चा पक्ष मजबूत करण्यावर ते भर देत आहेत. ठाकरे शिवसेनेत कुणी प्रबळ व अनुभवी नेता शिल्लक राहताच नये, यादृष्टीने शिंदेंनी पावले टाकायला सुरुवात केली आहे.
2022 मधील पक्षफुटीनंतर रत्नागिरी, सिंधुदुर्गातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उद्धव यांच्या सेनेने चांगली कामगिरी केल्याचे निकाल समोर आले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीआधी ठाकरेंनी ‘जनसंवाद’ सभांमधून कोकणात बऱ्यापैकी वातावरण निर्मिती केली होती. मूळ शिवसेना पक्षातील खासदार, आमदार मोठ्या संख्येने आपल्याला सोडून गेले असले तरी सच्चा शिवसैनिक आणि शिवसेनेचा पारंपरिक मतदार अजून आपल्याच पाठीशी आहे, असा विश्वास निर्माण करण्यात त्यांचा जनसंवाद यशस्वी झाला होता. परंतु प्रत्यक्षात निवडणुकांमध्ये मात्र ठाकरे सेनेला ‘विनिंग स्कोअर’ करता आला नाही. निर्णायक मते मिळवण्यात ठाकरे शिवसेना बरीच कमी पडली. केवळ सहानुभूतीच्या जोरावर अन् सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजी केंद्रभूत ठेऊन आजकाल निवडणुका जिंकता येत नाहीत, हे राजकीय वास्तव ठळकपणे अधोरेखित झाले.
आज भाजपविरोधात प्रखर विरोधी भूमिका घेणारा एक तगडा नेता अशी उद्धव ठाकरे यांची प्रतिमा देशभरात नक्कीच आहे. परंतु केवळ आणि केवळ याच प्रतिमेच्या जोरावर आपल्या पक्षाला राज्यभरात भरीव यश का मिळत नाही, याची नेमकी कारणे ठाकरेंना शोधावी लागतील. ‘सत्ता’ हेच यामागचे एक मुख्य कारण असेल तर आगामी काळात मोठ्या निवडणुका जिंकण्यासाठी आतापासूनच तयारी करावी लागेल. तशी तयारी त्यांनी सुरू केलीही असेल. मुंबई महानगरपालिका निवडणूक त्यादृष्टीने महत्त्चाची ठरणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात त्यांच्या पक्षाला मोठा हादरा बसला असला तरी मुंबईमध्ये जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. मुंबईत त्यांचे तीन खासदार आणि 10 आमदार निवडून आले आहेत. राज्यभरात त्यांचे केवळ 20 आमदार निवडून आले असताना त्यापैकी एकट्या मुंबईतूनच निम्मे आमदार आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांना सामोरे जात असताना ठाकरे यांच्यासाठी ही जमेची बाजू म्हणावी लागेल. पण त्याचवेळी राज्यात जिल्हा परिषदा किंवा नगर परिषदांच्याही निवडणुकांचे बिगुल वाजू शकते. कारण या अगोदर राज्यात मुंबईसह अन्य काही महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाचवेळी झालेल्या आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेचे भवितव्य ठरविण्यासाठी मुंबई महानगरपालिका निवडणूक खूप महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे जास्त लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कोकणात काहीशी कमकुवत झालेली पक्ष संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी कितपत लक्ष दिले जाणार, हा देखील प्रश्न आहे. कोकणातील डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे लवकरच कोकणचा दौरा करणार असल्याचे सांगितले जात आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंना अजून काही राजकीय धक्के देण्यासाठी शिंदे शिवसेना आणि भाजपने काही पक्षप्रवेशाचे कार्यक्रम राखून ठेवले आहेत.
महेंद्र पराडकर